मुस्लीम समाजातील उणिवा दूर करण्याची जबाबदारी स्वत: समाजावरच आहे. शिक्षणाशिवाय समाजाला पुरेसे हक्क मिळणार नाहीत व उणीवाही दूर होणार नाहीत, असे प्रतिपादन आ. मुझफ्फर हुसेन यांनी येथे बोलताना केले.
जिल्हा काँग्रेसच्या वतीने यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आज ‘जिल्हा अल्पसंख्यांक परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे आदी उपस्थित होते. हुसेन यांची विधानपरिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी अल्पसंख्यांकासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
समाजात आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना वाढत आहे, परंतु सरकार विविध योजना राबवत असूनही त्याचा लाभ घेण्यात कमी पडत आहे असे आ. हुसेन यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्य लढय़ात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मदरशांशी आज दहशतवादाचा जोडला जाणारा संबंध दुर्दैवी असल्याचे सांगून ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे दलित समाजाची एकजूट झाली, तसा नेता अल्पसंख्यांक समाजाला मिळाला नाही. हिंदू धर्मातील मठांनी शिक्षणाला महत्व दिले व या समाजाने प्रगती केली, तसे महत्व मदरशांनी नंतरच्या काळात दिले नाही त्यामुळे मुस्लिमांमध्ये बेरोजगारी वाढली व समाज मागास राहिला.
मुस्लिमांसह देशाची प्रगती हेच तत्व काँग्रेसने राबवले, त्यामुळेच समाजावर अन्याय होतो हे सांगणारी केवळ काँग्रेसच आहे, त्यासाठीच सच्चर आयोग स्थापन करुन त्याच्या शिफारसीही प्रकाशित केल्या व त्या लागू करण्यासाठी काँग्रेसने पाऊले उचलली, असे हुसेन म्हणाले.
अल्पसंख्यांक समाजाचा देशाच्या प्रगतीत मोठा वाटा आहे, मुस्लीम समाजाने नेहमीच लोकशाही तत्वांना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे समाजास शिक्षणाबरोबरच व्यवसायासाठीही आधार देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री थोरात म्हणाले. मंत्री विखे यांनी जिल्ह्य़ात अल्पसंख्यांकाच्या योजनांना चालना देण्यासाठी अधिकाऱ्यांसह स्वतंत्र बैठका घेण्याचे आश्वासन दिले. अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य शौकत तांबोळी यांनी विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या शिक्षणासाठी सरकारने १०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह मंजूर केल्याने महसूल विभागाने त्यास जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मंत्री थोरात यांनी प्रयत्न करण्याचे अवाहन जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी केले. माजी प्राचार्य कादीर, अशोक त्रिभुवन यांची भाषणे झाली. उबेद शेख यांनी प्रास्ताविक केले. विनायक देशमुख, शरद रणपिसे, रईसा शेख, शेख महमद रफी, प्रेमानंद रुपवते, सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.