राजधानी दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे देशभर ऐरणीवर आलेल्या महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ानंतर शिवसेनेने महिलांना चाकू आणि मिरची पूड वाटली. पण या दोन्ही वस्तू स्वयंपाकघरातील आपापल्या जागी दाखल झाल्या असून नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या पर्स-पिशवीत त्यांना थारा नसल्याचे पहिल्यासारखेच दृश्य पुन्हा दिसू लागले आहे. या चाकूची रवानगी स्वयंपाकघरात, तर मिरची पावडरचा वापर लगेचच फोडणीत करण्यात आल्याने, या वस्तूंचे वाटप करण्याच्या व्यापक कार्यक्रमाचा उत्साह मावळला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी, गेल्या आठवडय़ात मुंबईत काही हजार महिलांना सात सेंटिमीटर लांबीचा चाकू आणि लाल मिरचीची पूड असलेली पुडी वाटण्यात आली. कोणत्याही विकृत हल्ल्यांपासून स्वतचा बचाव करण्यासाठी महिलांनी या दोन वस्तू नेहमी स्वतसोबत ठेवल्याच पाहिजे, असा या वाटपामागील संदेश होता. शस्त्र बाळगण्याप्रकरणी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी, स्वसंरक्षणार्थच्या ऐवजी फळे कापण्यासाठी चाकू सोबत बाळगल्याचे स्पष्टीकरण द्यावे, अशा सूचनाही अप्रत्यक्षपणे देण्यात आल्या होत्या. तरीही शिवसेनेच्या या चाकू वाटप कार्यक्रमाची पोलिसांनी योग्य ती दखल घेतलीच. त्याबाबत कायदेशीर अंगांनी विचारविनिमयदेखील पोलीसांच्या वर्तुळात सुरू झाला, आणि मुंबई परिसरात एक असे लाख चाकू वाटण्याचा आगामी कार्यक्रमाचा संकल्प डळमळीत झाला. केवळ महिलांच्या मनात आत्मविश्वास रुजविण्याच्या हेतूनेच हे वाटप करण्यात आले होते, असे स्पष्टीकरण नंतर या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिले. सहा इंचापेक्षा कमी लांबीचा चाकू कायदेशीरदृष्टय़ा शस्त्र या संज्ञेत गणला जात नाही, असाही युक्तिवाद याबाबत करण्यात आला. महिलांना वाटण्यात आलेल्या मिरची पावडरच्या पुडय़ादेखील, संसारोपयोगी वस्तू म्हणून गणल्या जातील याची काळजी घेण्यात आली. प्रत्यक्षात, एखादा हल्ला झालाच तर हल्लेखोराच्या डोळ्यात तिखट फेकावे हाच यामागील संदेश होता. मात्र, छेडछाड करणाऱ्यांनी योग्य तो बोध घ्यावा यासाठीच असे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले, अशी सारवासारव सुरू झाली. कुणी छेडछाड केलीच, तर चाकू चालवायला मागेपुढे पाहू नका, असा सल्ला देणारे वक्तव्य त्याआधी या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी काहींनी केले होते. यातून काही कायदेशीर गुंतागुंत निर्माण झालीच, तर कायदेशीर मदतीचीही तरतूद करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. दरम्यान, दिल्लीतील त्या घटनेनंतर मुंबईतील कराटे व स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गांना मात्र गेल्या काही दिवसांपासून तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येते.