तालुक्यातील कर्जुले हर्या येथील हरेश्वर मंदिरातील दानपेटी चोरटय़ांनी पळवून नेली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दीड महिन्यात या मंदिरातील चोरीची ही तिसरी घटना असून ग्रामस्थामधे संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दुसऱ्या चोरीनंतर मंदिरात बसवलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणातून महत्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.  
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कर्जुले हर्या येथे हरेश्वराचे मंदिर आहे. शुक्रवारी रात्री  चोरटय़ांनी मंदिरातील दानपेटी लांबविली. पारनेरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले, उपनिरीक्षक मारूती मुळूक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पेटीचा शोध घेतला असता पुणे जिल्ह्य़ाच्या हाद्दीजवळ आणे घाटात दानपेटी टाकून देण्यात आल्याचे आढळले.
चोरटय़ांनी या पुर्वी मंदिरातील चांदीचा मुकूट व दागिने, दानपेटी चोरली होती. त्याचा तपास लावण्यात पारनेर पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यातच पुन्हा दानपेटी पळवल्याने पारनेर पोलिसांसमोर चोरटय़ांनी आव्हान उभे केले आहे. दरम्यान या चोरी प्रकरणी पोलिसांनी सीसी टीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर त्यातून महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. निरीक्षक ढोकले स्वत: आरोपींच्या शोधार्थ रवाना झाले आहेत. कॅमेऱ्यातील फुटेजमुळे या मंदिरातील तिन्ही चोऱ्यांचे सुत्रधार पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(चौकट)
शनिवारीच चोऱ्या
या मंदिरातील तिन्ही चोऱ्या २० दिवसांच्या अंतराने  शुक्रवारच्याच मध्यरात्री झाल्या आहेत. त्यामुळे तीनही चोऱ्यांमधील आरोपी एकच व माहितगार असण्याची शक्यता वर्तविण्यात येते.