आदिवासी दादा खऱ्या अर्थाने आता जंगलाचा राजा झाला आहे. वनकायदा २००६ मध्ये जरी झाला असला तरी आदिवासी गावांना मागील ३ ते ४ वर्षांत खऱ्या अर्थाने जंगल संपत्तीवर अधिकार मिळाले आहेत. आदिवासी गावातील वाढलेल्या उत्पन्नानुसार त्यांचे राहणीमानही झपाटय़ाने बदलेले आहे, असे सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग यांनी आंतरराष्ट्रीय संदर्भ लाभलेल्या १६ व्या आरोग्य संसदेत बोलताना सांगितले. डॉ. राणी बंग, माजी आमदार हिरामण वरखडे, देवाजी तोफा यावेळी उपस्थित होते.
‘सर्च’ संस्थेतर्फे संसदेत फिरता दवाखान्यांद्वारे मिळणारी आरोग्यसेवा, गावसंगी उपक्रम, युवकांचे खेळ, अॅम्बुलन्स सेवा व बांबूकटाई, तेंदूपत्तामधून मिळालेले गावाचे उत्पन्न व योग्य विनियोग या प्रमुख विषयावर नाटकांच्या माध्यमातून संवाद करत कार्यक्रमाची मांडणी करण्यात आली. मागील एका वर्षांत फिरता दवाखान्याद्वारे ४२ गावातील एकूण ९ हजार रुग्ण तपासण्यात आले.
उत्पन्न व खर्चाबाबत सर्च चमूने गोळा केलेल्या माहितीनुसार बघता धानोरा तालुक्यातील ४२ गावातील २ हजार कुटुंबाच्या दहा हजार लोकसंख्येला मिळून एकूण ३ करोड रुपये एवढे प्रचंड उत्पन्न मिळाले. मागील एका वर्षांच्या काळात मिळालेले उत्पन्न असले तरी या गावाचा याच काळातील विविध बाबींवर झालेला खर्च काही कमी नाही. हा खर्च चार कोटी रुपयांच्या घरात आहे. हा खर्च बघता आपल्या आदिवासी बांधवांनी आपला पैसा कसा खर्च करायचा हे शिकले नाही तर चुकीच्या सवयीतून फसवणूक होऊ शकते.
याबाबत डॉ. अभय बंग व हिरामण वरखडे यांनी उपस्थितांसोबत चर्चा केली. रोजगार हमी २६ लाख, बांबूकटाई ८२ लाख, तेंदूपत्ता ८७ लाख, तेंदूपत्ता बोनस ८१ लाख रुपये एवढे उत्पन्न या गावांना मिळाले आहे. झालेल्या एकूण खर्चापैकी ८ टक्के खर्च उत्पन्न वाढविणाऱ्या गोष्टींवर झाला आहे. म्हणजेच शेती आणि सिंचनावर तर २८ टक्के खर्च कौटुंबिक उपयोगी बाबींवर झाला आहे. म्हणजेच शिक्षण, आरोग्य, टीव्ही, मोबाईल, वीज इत्यादी. तसेच ६४ टक्के खर्च हा ज्याची फारशी गरज नाही अशा गोष्टींवर झाला आहे. आदिवासींनी कोंबडा बाजार, दारू, देवकाम, गाडी, लग्न इत्यादी बाबींवर झाला. पैसे स्वत:च्या कुटुंबासाठी कसे वापरायचे, विनीयोग कसा करायचा, याचा विचार होणे गरजेचे आहे, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.
रोजगार हमीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा वनातून मिळणारे उत्पन्न दहापट आहे.त्यामुळे जंगल हेच आपल्यासाठी उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने जंगल बचाव करणे महत्त्वाचे आहे. इतर गौण वनउपजाचे उत्पन्न लक्षात घेतले नाही तर निव्वळ बांबूकटाई व तेंदूपत्तापासून मोठे उत्पन्न गावाला मिळाले आहे. जंगल ही सोन्याची खाण असून जंगल आदिवासींसाठी मायही आहे व बापही आहे. म्हणून जंगल सांभाळणे, जंगल राखणे, वाढविणे शिकलं पाहिजे, असे आवाहन डॉ. बंग यांनी यावेळी आदिवासी बांधवांना केले.
धानोरा तालुक्यातील ४२ गावातील २५० आदिवासी बांधव या संसदेत सहभागी झाले होते. या पद्धतीने मागील वर्षभराच्या केलेल्या कामाचा आढावा घेत डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, माजी आमदार हिरामण वरखडे, देवाजी तोफा व गावातील प्रतिनिधी, मुख्य पुजारी अंताराम परसे यांनी मिळून पुढील वर्षभरासाठी कृती कार्यक्रम ठरविला. सर्च आदिवासी विभागाचे समन्वयक तुषार खोरगडे यांनीही उपस्थितांसोबत संवाद साधला. देवला कडयामीबाई यांनी गोंडी भाषेत आदिवासी महिलांसोबत चर्चा केली.
सोळाव्या संसदेत फिरत्या दवाखान्याद्वारा दिली जाणारी आरोग्यसेवा वाढवावी, फिरता दवाखान्याद्वारा सेवेसोबतच आरोग्य प्रशिक्षण दिले जावे, गावाचे वाढलेले उत्पन्न सांभाळण्यासाठी महिलांची ग्रामसभा करून निम्मा निधी महिलांच्या हाती ठेवावा, जेणेकरून चुकीच्या बाबींवर खर्च होणार नाही, आदिवासी बांधवांचे उत्पन्न आणखी वाढावे यासाठी उत्पन्न वाढीच्या संबंधातील प्रशिक्षण गावात सुरू करावे (उदा. बांबू लागवड, व्यवसाय प्रशिक्षण), खेळ खेळावे, नृत्य नाचावे व युवा वर्गाचे वाचन वाढवावे, मच्छरदाणी कार्यक्रम सुरू ठेवावा, जे संगी सेवक गावात काम करत नाही त्याठिकाणी निर्णय घेऊन स्त्री सेवक नेमावा, फिरत्या दवाखान्यात स्त्री डॉक्टर व गोंडी भाषेत बोलणाऱ्या नर्सचा समावेश करावा, आदी निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.