आमगाव तालुक्याच्या जांभूरटोला येथील शासकीय नोकरीतील व्यक्तीने वनजमिनीच्या सातबारावर खोटी नोंद घेऊन वनजमीन आपल्या ताब्यात केली. शासनाची दिशाभूल करून वनजमीन हडपणाऱ्याची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जांभूरटोला येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील संमतदास पोटू घरडे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ते कोटवार होते. त्यांनी वनजमिनीच्या सातबारावर खोटी नोंद करून शासनाची दिशाभूल केली. त्याचे वारस म्हणून दिलीप संमतदास घरडे यांच्या नावाने आता पट्टा मिळाला आहे. दिलीपच्या नावाने ४ एकर शेती आहे आणि तो शासकीय नोकरीत तिगावच्या पशुचिकित्सालयात आहे. त्याची पत्नी जांभरटोला येथील अंगणवाडीत सेविका आहे. त्यांची दुमजली इमारत आहे. हा स्वत:ची जमीन घरी राबत नाही. बटईने किंवा ठेका पद्धतीने जमीन राबण्यास दुसऱ्यांना देतो, मात्र याला भूमिहीन शेतमजूर समजून पट्टे देण्यात आले. जितेंद्र संमतदास घरडे यांच्या नावाने ४ एकर शेती आहे. हा वाघडोंगरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण सेवक आहे. घरी शेतजमीन असूनही ती जमीन न राबता बटई किंवा ठेका पद्धतीने जमीन राबण्यास देतात, परंतु यांनाही पट्टा देण्यात आला. हिरकन हरिदास खोब्रागडे ही महिला मृत्यू पावली आहे. तिचे तीन वारस आहेत.
दीपक हरिदास खोब्रागडे हा भंडाऱ्यात हिवताप आरोग्य अधिकारी आहे. सुनील हरिदास खोब्रागडे हा देवरी रोड आमगाव येथे विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात लिपिक आहे. अनिल हरिदास खोब्रागडे हा हिराटोला येथे कृषी विद्यापीठात कर्मचारी आहे. एवढेच नाही, तर जांभूरटोला येथे स्वस्त धान्य दुकानही चालवत आहे.
हरिदास खोब्रागडे यांच्या तिन्ही मुलांच्या नावे ७ एकर जमीन आहे. ही शेतजमीन स्वत: राबत नाही. दुसऱ्यांकडून राबवून घेतात. तिन्ही भाऊ जांभूरटोला या गावी न राहता कुंभारटोली येथे राहतात. या व्यक्तींना वनजमिनीचे पट्टे देण्यात आले. या प्रकरणातील दोन्ही पट्टे मिळवून घेणारे व्यक्ती कोटवार असल्यामुळे यांनी वनजमिनीच्या सातबारावर खोडतोड करून १९६५ मध्ये अतिक्रमण केल्याचा खोटा सातबारा तयार केला. त्यांनी वन समितीच्या अध्यक्षांशी देवाण-घेवाण करून ठराव घेतला आहे. या व्यक्तींचे कोणत्याच प्रकारे अतिक्रमण नाही, याची माहिती गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून सहज मिळेल. गरजूंना वनविभागाची जमीन न मिळता नोकरीपेशातील तिघांना ही वनजमीन मिळाल्याने गावात आक्रोश आहे. गावातील वयोवृद्ध प्रतिष्ठित नागरिकांसमोर चौकशी करण्यात यावी व त्यानंतर नागरिकांचे सहमतीने ठराव घेऊन हे पट्टे मिळवून घेणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे अतिक्रमण नसल्याने जमिनीचे पट्टे रद्द करावे. पट्टे मिळवून घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाने पट्टे रद्द न केल्यास गावातील सर्व लोक वनजमिनीवर अतिक्रमण करतील, असा इशारा गावातील प्रेमलाल बिसेन, कुवरलाल येळे, जियालाल बिसेन, जैयपाल सोनवाने, धर्मराज येळे, बाबुलाल सोनवाने, कन्हैयालाल येळे, फतू सोनवाने, भोजलाल सोनवाने, उत्तम मेश्राम, टेकचंद येळे, राजेंद्र येळे व इतर गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.