सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आणखी एका पालीची नोंद झाली असून चंद्रपूर शहरातील पठाणपुरा भागातून वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना दुर्मीळ कोलेगल जातीची पाल आढळली. गेल्या सात वर्षांपासून ते सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करीत असून, त्यांच्या या अभ्यासाला नव्या नोंदीमुळे बळ मिळाले आहे.
या संदर्भात माहिती देताना ते म्हणाले, ही पाल कोलेगल जातीची असून त्याचे इंग्रजी नाव forest spotted gecko किंवा collegal gecko आहे. त्याचे शास्त्रीय नाव geckoella collegalensis आहे. या पालीचा शोध १८७० मध्येboulenger या वैज्ञानिकाने BR hill कर्नाटकातून लावला. ही पाल केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये मिळाल्याच्या नोंदी आहेत. चंद्रपुरातून ही पाल याआधी एका शोधनिबंधात २०१० मध्ये प्रसिद्ध करण्यात आली, पण त्यानंतर ही पाल कधीच मिळाल्याची नोंद नाही. कोलेगल जातीची पाल अतिशय देखणी असून मुख्यत: जंगलाच्या भागात तिचे वास्तव्य असते. जंगलाव्यतिरिक्त खडकाळ, माळरान, रान, शेतातसुद्धा ती राहते. पालापाचोळा, मोठे दगड व जमिनीच्या भेगांमध्ये राहणे तिला अधिक आवडते. झुरळ, नाकतोडे, रातकिडे, कातरणी व असे किडे तिचे भक्ष्य आहेत. या अभ्यासादरम्यान परिसरातील नागरिकांनीही मार्गदर्शन केले. तसेच या कार्यात डॉ. सचिन वझलवार, किरण बावस्कर, वनदीप रोडे, प्रमोद दुबे, प्रशांत खोबरगडे यांनीही मोलाचे सहकार्य केल्याचे दिनेश खाटे यांनी सांगितले.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अशीच चंद्रपूर जिल्ह्याची ओळख झाली आहे. वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातीमुळे अभ्यास करणारेदेखील या जिल्ह्यात मोठय़ा संख्येने आहेत. हा संपूर्ण परिसर जैवविविधतेने नटलेला असून तेथे अनेक दुर्मीळ जातीचे पशु, पक्षी, झाडे, कीटक व सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. मात्र, मनुष्य सिमेंटच्या जंगलातच त्याचे जीवन व्यतित करत असल्याने अशा दुर्मीळ प्राण्यांकडे शहरातील व्यक्तींचे फारसे लक्ष जात नाही.  अशाच दुर्मीळ प्राण्यांच्या अभ्यासासाठी येथील वन्यजीव अभ्यासकांनी निश्चय केला आणि गेल्या कित्येक वषार्ंपासून चालत असलेल्या या अभ्यासावर आता खऱ्या अर्थाने त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.