सेवेची दहा वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक या वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाने सर्वाधिक ६१.४७ टक्के निकालासह राज्यात बाजी मारली. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे ही परीक्षा घेण्यात आली.
औरंगाबाद परिक्षेत्रातील ७५८ कर्मचाऱ्यांनी या परीक्षेस नोंदणी केली होती. पैकी ७०९ पोलीस कर्मचारी परीक्षेस बसले. यातील ४६६ परीक्षार्थी गुणवत्ता यादीत चमकले. परीक्षेसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली होती. या बरोबरच स्पर्धा परीक्षांनी युक्त ग्रंथालयही सुरू केले होते. विधी महाविद्यालयातील विविध विषयांच्या प्राध्यापकांचे, न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन या वेळी परीक्षार्थी पोलिसांना लाभले. निवृत्त पोलीस अधीक्षक अंकुश आघाव यांनी कमीत कमी वेळेत पेपर कसा सोडवावा, या बाबत मार्गदर्शन केले. यशस्वी परीक्षार्थीचे पोलीस आयुक्त संजय कुमार, उपायुक्त सोमनाथ घार्गे, अविनाश आघाव यांनी अभिनंदन केले.