महापालिकेच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची उधळण करीत सत्तास्थान मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जंगजंग पछाडले. परंतु, मतदारांनी ‘नवनिर्माणाचे’ स्वप्न दाखविणाऱ्या मनसेला कौल दिला. या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागलेल्या शिवसेनेतील अंतर्गत वादविवाद मिटण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसून राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी येथे सेनेच्या तीन माजी नगरसेवकांनी मनसेत प्रवेश केल्याने सेनेला अजून एक हादरा बसला आहे.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी देताना काही निष्ठावंतांवर अन्याय झाल्याचे म्हटले जात होते. त्यामुळेच सेनेला काही हक्काच्या जागा गमवाव्या लागल्याचीही चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. अनेक असंतुष्ट माजी नगरसेवक स्थानिक नेतृत्वाच्या राजकारणाला वैतागले असून ते कधीही शिवसेनेतून बाहेर पडण्याची वंदता असतानाच बुधवारी संजय नवले, पुंजाराम गामणे, चंद्रकांत खोडे या माजी नगरसेवकांनी येथील शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. सेनेतील आणखी काही माजी नगरसेवक मनसेत जाण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे.
पालिका निवडणुकीनंतर शिवसेनेची होत असलेली वाताहात अद्यापही थांबलेली दिसत नाही. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर काहीसे दुर्लक्षित असलेले माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांनीही पक्षातील अंतर्गत वादावर जाहीररीत्या नाराजी व्यक्त केल्याने स्थानिक सेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठय़ावर असल्याचे मानले जात आहे.
या पाश्र्वभूमीवर, इगतपुरी पालिकेतील सत्ता सलग वीस वर्ष आपल्याकडे कायम ठेवण्याचा आनंदही सेनेच्या जिल्हा नेतृत्वाला घेता येऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे त्र्यंबक नगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेने सर्वाधिक जागा मिळवित सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. मनसेची लोकप्रियता अशीच कायम राहिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची चांगलीच तयारी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.    

स्थानिकांमुळेच शिवसेनेची वाताहत
२००७ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलो असतानाही शिवसेनेची संगत केली. २०१२ मध्ये उमेदवारी देण्याचे आश्वासन वरिष्ठांकडून देण्यात आले. परंतु उमेदवारी मिळाली नाही. स्थानिकांच्या राजकारणामुळेच निवडणुकीत सेनेची वाताहत झाली. तळागाळातील लोकप्रतिनिधींकडे वारंवार केल्या जाणाऱ्या दूर्लक्षामुळे आपणच सेना सोडण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक संजय नवले यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर दिली. यापुढे पक्ष देईल, ती जबाबदारी सांभाळणार असून संघटनेच्या वाढीसाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.