देशातील राजकारण्यांचा प्रवास संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती असा होत असल्याची टीका प्रत्येक स्तरावर केली जात असून त्याला छोटी शहरेदेखील अपवाद नाहीत. मुंबईनंतर चार-पाच श्रीमंत पालिकांच्या यादीत असलेल्या नवी मुंबई पालिकेतील आजी-माजी नगरसेवक, त्यांची मुले, पत्नी या करोडपती असल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले आहे. यातील अनेक नगरसेवक हे काही वर्षांपूर्वी लखपतीदेखील नव्हते, पण आता करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यात काही नगरसेवकांचे पत्ते कट झाल्याने त्यांची संपत्ती जाहीर करण्याचा प्रश्न आला नाही.
पालिका निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या मालमत्तेचे विवरणपत्र सादर केले आहे. त्यात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून माजी नगरसेवक दिलीप तिडके असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना भाजपची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली असून ते ६५ कोटींचे धनी आहेत. त्याची रायगड व नगर जिल्ह्य़ात जमीन आहे. या जमिनीची किंमत वाढली आहे. तिडके यांच्यानंतर याच विभागातील काँग्रेसचे संतोष शेट्टी हे श्रीमंत आहेत. कधीकाळी एका हॉटेलमध्ये काम करणारे शेट्टी तीनवेळा नगरसेवक झाले असून ते ५७ कोटींचे मालक आहेत. त्याचा बस ट्रान्स्पोर्ट व हॉटेल व्यवसाय आहे. सिडकोचे माजी संचालक हे विधानसभा निवडणुकीत जास्त आयकर भरणारे शहरातील उमेदवार ठरले होते. त्यांनी पालिका निवडणुकीत ३० कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. त्यामुळे नेरुळ विभाग श्रीमंत उमेदवारांचा विभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले हे फक्त साडेतीन कोटींचे मालक आहेत. विधानसभा निवडणुकीत ही संपत्ती त्यांनी जाहीर केली होती. त्यांचे सर्व व्यवसाय सांभाळणारा त्यांचा मुलगा ममित हा आता पालिका निवडणुकीत उभा असल्याने त्यांच्या नावावर बारा कोटींची मालमत्ता आहे. मावळत्या सभागृहाचे सभागृह नेते अनंत सुतार यांच्याकडे दोन कोटी ५० लाखांची संपत्ती आहे. चौगुले यांचे कोळी जावई आकाश मढवी यांनी एक कोटी ५४ लाख रुपये दाखविले आहेत. पालिकेच्या अतिक्रमण घोटाळ्यातील एक आरोपी एम. के. मढवी यांनी बारा कोटींची संपत्ती गेल्या काही वर्षांत जमा केली आहे. वाशी येथील शिवसेनेचे नेते विठ्ठल मोरे याची एक कोटी ८७ लाखांची मालमत्ता आहे, तर दिवंगत माजी महापौर तुकाराम नाईक यांची कन्या वृशाली नाईक यांची ११ कोटी २६ लाख रुपये संपत्ती आहे. एफएसआय फेम नगरसेवक किशोर पाटकर यांनीही आपली संपत्ती ३६ कोटी असल्याचे सांगितले आहे. त्यांची पनवेल तालुक्यात खूप मोठी जमीन आहे. दिघा येथील एमआयडीसी भागात येणारी बहुतांशी जमीन ही गवते कुटुंबाची आहे. त्याच्या विक्रीतून त्यांना करोडो रुपये मिळालेले आहेत. त्यामुळे कोणताही गवते हा करोडपती आहे. त्यामुळे नवीन गवते १ कोटी ८३ लाख, तर जगदीश गवते बारा कोटींचे धनी आहेत. तुर्भे येथील भाजपचे एकुलते एक नगरसवेक रामचंद्र घरतही २४ कोटी राखून आहेत.