दिवाळीच्या तोंडावर नागपुरात किल्ल्यांची दुनिया पुन्हा अवतरत आहे. घराच्या परिसरात माती आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करून शिवकालीन आणि काल्पनिक किल्ले बनविणे सुरू झाले आहे. किल्ले तयार करणे एक विशेष कला असून किल्ले स्पर्धामुळे याला एक योजनाबद्ध स्वरूप आले आहे. 
नागपुरात गेल्या २६ वर्षांपासून विविध संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या किल्ले स्पर्धांच्या निमित्ताने छोटय़ा छोटय़ा आखीव-रेखीव किल्ल्यांचे विश्व संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण झाले आहे. नागपुरात तयार केले जाणारे हुबेहूब ऐतिकासिक किल्ले आणि अफाट कल्पनाशक्तीतून साकारलेले आगळेवेगळे किल्ले पाहण्यासाठी होणारी गर्दीदेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
संगणकाच्या युगातही गेल्या काही वर्षांत बालगोपालांमध्ये किल्ले बनविण्याची ओढ आजही कायम आहे. दिवाळीतील सुटय़ांमध्ये मुलांमधील सुप्त कलागुणांना चालना देण्याचे काम या किल्ल्यांमुळे होते. संगणक किंवा दूरचित्रवाणी संचापुढे बसणाऱ्या पिढीचे किल्ले बनविण्याच्या निमित्ताने माती आणि इतिहासाशी नाते जोडू पाहण्याचा प्रयत्न दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये होत आहे. मुलांना शिवकालीन किल्ल्यांची माहिती देणे, नकाशे पुरविणे, त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करणे यासाठी आता विदर्भात अनेक संस्था पुढे येऊ लागल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले, काल्पनिक किल्ले आणि वैदर्भीय किल्ले अशा तीन गटात आयोजित केली जाणारी शिववैभव किल्ले स्पर्धा सर्वासाठी खुली आहे. १९८६ पासून ही स्पर्धा आयोजित केली जात असून मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. नागपुरात स्वतंत्र घरांची संख्या कमी होऊन फ्लॅट संस्कृती रुजली आहे. त्यामुळे अपार्टमेंटमधील सर्वानी एकत्र येऊन किल्ला तयार करण्याची सांघिक वृत्तीही या स्पर्धेच्या निमित्ताने दिसून येते.
शहरातील विविध भागात मुले दगड, माती, वाळू, प्लास्टर ऑफ पॅरिस, सीमेंट, रंग, पत्रे, थर्माकॉल, पाईप, फुटलेले फटाके आदींचा कल्पकतेनं वापर करून किल्ले तयार करीत असतात.
लक्ष्मीनगर, रामदासपेठ, धंतोली, महाल, मानेवाडा, वाडी या भागात किल्ले तयार करण्याचे काम सुरू आहे.

किल्ले स्पर्धाची संधी
शिववैभव किल्ले स्पर्धेत प्रत्येक गटातील यशस्वी किल्ल्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय किल्ले तयार करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कलावैभव, ५ गिरीपेठ येथे प्रत्यक्ष किंवा ९४२१७०५३८१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. महालातील ‘शुभंकरोती’ या संस्थेतर्फे ‘किल्ले स्पर्धा व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा’ आयोजित केली आहे. ही स्पर्धा मध्य नागपुरातील स्पर्धकांसाठी खुली आहे. मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्यातर्फे प्रथम येणाऱ्या विजेत्यांना ‘आमदार चषक’ प्रदान करण्यात येणार असून एकूण ४० रोख पारितोषिके आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह दिली जातील. किल्ले स्पर्धेचे परीक्षण १०, ११ व १२ नोव्हेंबरला तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण १२ नोव्हेंबरला होईल. तसेच दोन्ही स्पर्धेचे बक्षीस वितरण १८ नोव्हेंबरला, सकाळी ९.३० वाजती मुंजे सभागृह येथे होईल. अधिक माहितीसाठी मनोज वैद्य (९८२२९४९२६०) किंवा रेणुका पत्राळे (९९७०६६२२५०) यांच्याशी संपर्क साधावा.