08 March 2021

News Flash

शिवजयंतीनिमित्त गड-किल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शन

दसक-पंचक परिसर सेवा मंडळ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त जेलरोडच्या शिवाजीनगरमधील समाजमंदिरात गड- किल्ल्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

| February 21, 2015 01:29 am

दसक-पंचक परिसर सेवा मंडळ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त जेलरोडच्या शिवाजीनगरमधील समाजमंदिरात गड- किल्ल्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २१ फेब्रुवारीपर्यंत सर्वासाठी खुले आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. सुनील बोराडे, प्रभावती महानुभाव, उत्तम रकिबे, सोम्याबापू हांडोरे यांसह नगरसेवक उपस्थित होते. प्रास्तविक अ‍ॅड. बोराडे यांनी केले. राजू सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवकाळात गड आणि किल्ल्यांचे महत्व किती होते, स्वराज्याची स्थापना करण्यात शिवाजी महाराजांना गड-किल्ल्यांची कशी मदत झाली, या गड-किल्ल्यांचे संवर्धन का आवश्यक आहे, ही सर्व माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली.
जिजाऊ संस्थेतर्फे स्वयंरोजगार प्रशिक्षण
महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती आणि जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या वतीने गोविंदनगर जिजाऊ वाचनालयात महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्गास शिवजयंतीपासून सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी जिजाऊ सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी बोरस्ते, इंद्रजीत टेक्निकल इन्स्टिटय़ूटचे पदाधिकारी, प्रशिक्षिक तसेच रुपाली गोळेसर व्यासपीठावर उपस्थित होते. इन्स्टिटय़ूटचे सोनवणे यांनी १४ वर्षांपुढील कोणतीही महिला एकूण १९ प्रशिक्षणापैकी कोणत्याही दोन अभ्यासवर्गात सहभाग नोंदवू शकते, असे नमूद केले. बोरस्ते यांनी महिलांना उत्तम गुणवत्तेचे प्रशिक्षण मिळेल याकडे प्रशिक्षकांनी लक्ष देण्याची सूचना केली. हे प्रशिक्षण म्हणजे विविध व्यावसायिक अथवा वैयक्तीक विकासाचा पाया असून त्याची सुरूवात शिवजयंतीपासून होत असल्याचा विशेष आनंद व्यक्त करून शिवछत्रपतींना घडवणाऱ्या माता जिजाऊपासून महाराष्ट्रातल्या स्त्री सबलीकरणाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी कृतीशील प्रयत्नाची कास धरणे आवश्यक आहे. अधिकाधिक महिलांना हे प्रशिक्षण मिळावे यासाठी संस्था पातळीवर पुढाकार घेण्याची ग्वाही बोरस्ते यांनी दिली.
‘शक्ती विकास’तर्फे रक्तदान शिबीर
नेहरू युवा केंद्र संलग्न नाशिक येथील शक्ती विकास अकॅडमी या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप, नेहरु युवा केंद्र प्रतिनिधी मनिषा जगताप, नागरी संरक्षण दलाच्या सातपूर उपविभागीय क्षेत्ररक्षिका वंदना कुलकर्णी उपस्थित होते. शिबीरात रक्तदात्यांना मनोहर जगताप यांनी समाजात असलेली रक्ताची गरज आणि रक्तदान केल्याने होणारे फायदे पटवून दिले. याप्रसंगी अकॅॅडमीतील तसेच इतर नागरिकांनी शिबीरात सहभागी होऊन रक्तदान केले.
रंगारवाडा शाळेत ज्ञानमंजुषा स्पर्धा
जुने नाशिक परिसरातील रंगारवाडा येथील शाळा क्रमांक ३५ मध्ये शिवजयंतीनिमित्त प्रभारी मुख्याध्यापिका छाया माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या जीवनावर ज्ञानमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. शिवप्रतिमेचे पूजनही करण्यात आले.
कार्यक्रमास सामाजिककार्यकर्ते अंकुश राऊत, शिरीष पाडवी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, ता जिजामाता, मावळे यांची वेशभूषा केली होती. इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषण केले. तसेच ‘एकच ध्यास करू अभ्यास अभियान’ या उपक्रमांतर्गत परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली.
आयटक कामगार कार्यालयात मार्गदर्शन
नाशिक येथील आयटक कामगार कार्यालयात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाकपचे जिल्हा सरचिटणीस कॉ. राजू देसले, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. दत्ता निकम उपस्थित होते. त्यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातील रयतेचा शिवाजी व शिवाजीचा राज्यकारभार या मुद्यांविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. रामदास भोंग, अन्सारी मुमताज, अजमल मन्सुरी, मंगेश निकम आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 1:29 am

Web Title: fort photo exhibition on occasion of shivaji birth anniversary
Next Stories
1 सपकाळ नॉलेज हबमध्ये ‘अस्तित्व २०१५’ उत्साहात
2 मालेगावी महावितरणचा लाचखोर अभियंता जेरबंद
3 बळीचा बकरा की सुटकेची संधी
Just Now!
X