News Flash

पोलिसांना रात्रभर पळवणारे कारमधील चौघे जेरबंद

एका पोलीस शिपायाच्या वाहनाला धडक दिल्यानंतर सुसाट पळणाऱ्या कारचा पाठलाग करणाऱ्या साऱ्या पोलीस यंत्रणेला अर्धे शहर पळायला लावणाऱ्या व या दरम्यान आठ-ते दहा वाहने

| January 13, 2015 08:22 am

– चित्रपटात शोभणाऱ्या थरारक पाठलागात १० पोलीस जखमी
– रस्त्यात टिप्पर आडवा टाकून मद्यधुंदांना अडवले

एका पोलीस शिपायाच्या वाहनाला धडक दिल्यानंतर सुसाट पळणाऱ्या कारचा पाठलाग करणाऱ्या साऱ्या पोलीस यंत्रणेला अर्धे शहर पळायला लावणाऱ्या व या दरम्यान आठ-ते दहा वाहने, लोखंडी कठडय़ांना धडका देऊन आठ-दहा पोलिसांना जखमी करणाऱ्या कारला अखेर रस्त्यात टिप्पर आडवा उभा करून अडवावे लागले. रात्रभर पाच तास पळवायला लावणारे कारमधील चौघे अखेर जेरबंद झाले. एखाद्या चित्रपटात शोभेल, अशा या वास्तव घटनेने काल रात्रभर थरार निर्माण केला होता.
अमरिंदरसिंग बाबुसिंग तठ्ठे (रा. भोसलेवाडी, लष्करीबाग), उत्तरसिंग महेंद्रसिंग (रा. किशनगड), जसवीरसिंग हरदीपसिंग (रा. बल्लारपूर, पतियाला) व गुरुदीपसिंग महेंद्रसिंग (रा. लष्करीबाग) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी वाहतूकदार असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. अमरिंदरसिंग याच्या चुलत बहिणीचे लग्न काल रात्री नागपुरात होते. या चौघांनी रात्री यथेच्छ मद्यप्राशन केले. त्यानंतर ऑडी कारने (जेएच/२०/बी/५७५७)शहरात फिरायला निघाले. अमरिंदर कार चालवित होता. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास सेमिनरी हिल्सवरील टीव्ही टॉवरजवळ त्यांनी रात्री गस्त घालणाऱ्या एका चार्ली शिपायाला धडक दिली व सुसाट वेगाने कार पळाली. तो खाली पडला. कारचा केवळ चार आकडी क्रमांक त्याने अचूक टिपला. कसेबसे उठून त्याने नियंत्रण कक्षाला सूचना दिली. नियंत्रण कक्षाने लगेचच या कारसंबंधी माहिती प्रसारित करून तिला पकडण्याचे आदेश दिले.
कारमधील तरुणांचे वर्णन पाहता ते उत्तर नागपुरात हमखास सापडतील, असा अचूक अंदाज बांधून आवळे चौकात या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार सुसाट वेगाने पळाली. पोलीस निरीक्षक दत्ता भापकर यांच्या नेतृत्वाखालील पाचपावली पोलिसांनी पाठलाग सुरू केला. राणी दुर्गावती चौक व परिसरात गल्लीबोळातून कार सुसाट पळत होती आणि पोलीस वाहनांनी तिचा पाठलाग सुरू होता. कामठी मार्गाने ही कार मारुती शोरूम चौकात आली. तेथे लावलेल्या लोखंडी कठडय़ांना धडक देऊन ही कार पुढे निघाली. तेथून ती कळमनामधून हिवरीनगर चौकात आली. तेथे कळमना पोलिसांनी लोखंडी कठडे लावले होते. चालकाच्या दाराला पकडून त्याला थांबण्यास बाध्य करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. सुसाट वेगाने आलेल्या कारने कठडे उडवले. तेथे शेषराव राऊत व संजय बांगडकर हे शिपाई जखमी झाले.
ही कार दिघोरीकडे गेली. ही कार रिंग रोडवर नक्कीच येईल, असा पोलिसांचा अंदाज खरा ठरला. रामभाऊ म्हाळगीनगर चौकात पोलिसांना पाहून कारने यू टर्न घेतला. थोडे समोर गेल्यावर पोलीस दिसल्याने कार डावीकडे वळणार तेवढय़ात समोरून पोलीस येत असल्याचे दिसल्याने कार थांबली. कार कुठे न्यायची या विचारात कार एक-दोन मिनिटे थांबली. तोपर्यंत दिघोरीकडून आलेली पाचपावली पोलिसांची जीप बेसा पॉवर हाऊस चौकात थांबून उजवीकडे वळणार होती. कार थांबल्याने पोलीस निरीक्षक भापकर व त्यातील काही शिपाई खाली उतरत असतानाच कार चालकाने सुसाट वेगाने कार मागे (रिव्हर्स) आणली आणि या जीपवर आदळली. ही धडक एवढी जबर होती की, या जीपच्या काचा फुटल्या आणि भापकर यांच्यासह शिपाई जखमी झाले.
ही कार पुढे म्हाळगीनगर चौकाकडे सुसाट निघाली. म्हाळगीनगर चौकाच्या थोडे पुढे उपनिरीक्षक गवई यांच्या नेतृत्वाखालील हुडकेश्वर पोलिसांनी आधीच एक टिप्पर थांबविला होता. त्या टिप्परसह पोलिसांनी त्यांची चारचाकी वाहने आडवी उभी करून ठेवली होती. अखेर सुसाट वेगात आलेली कार या सापळ्यात अडकली. कार टिप्परवर आदळली. त्याबरोबर कारच्या काचा फुटल्या. बाजूला दबा धरून बसलेले पोलीस कारवर अक्षरश: झेपावले. कारमधील चौघांना पोलिसांनी बाहेर खेचले. चौघे तेव्हाही एवढे मद्यधुंद होते की, त्यांना आधार देऊनच पोलिसांना वाहनात कोंबावे लागले, असे पोलिसांनी सांगितले. जखमी पोलिसांवर उपचार करण्यात आले.
रात्रगस्तीवर पोलीस उपायुक्त संजय लाटकर होते. त्यांच्या मदतीला अभिनाशकुमार व इशु सिंधु हे उपायुक्त आले. पश्चिम भागातील यंत्रणा सज्ज होती. गिट्टीखदान, जरीपटका, पाचपावली, लकडगंज, कळमना, नंदनवन, हुडकेश्वर, सक्करदरा आदींसह पूर्व, उत्तर व दक्षिण भागातल्या पोलीस ठाण्यातील पोलिसांची रात्रभर धावपळ झाली. नियंत्रण कक्षातही धावपळ सुरू होती. २०१३ मध्ये राजा गौस व त्याच्या साथीदारांनी असेच रात्रभर पोलिसांनी पळवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 8:22 am

Web Title: four accused arrested in nagpur
टॅग : Loksatta,Nagpur,News
Next Stories
1 रुग्ण हक्क कायद्याला खासगी डॉक्टरांचाच विरोध!
2 मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा!
3 स्वाईन फ्ल्यूचे शहरात दोन रुग्ण
Just Now!
X