तालुक्याच्या दक्षिण भागातील पळसुंदे लघुपाटबंधारे तलावाच्या २८ कोटी रुपये खर्चाच्या कामास शासनाने नुकतीच द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी तातडीने ८ कोटी रुपयेही वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या सुमारे एक तपापासून रखडलेला हा प्रकल्प आता मार्गी लागला आहे.
आदिवासी भागातील ५०० हेक्टर जमिनीस या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. अकोले तालुक्यात असला तरी हा तलाव कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यक्षेत्रात येतो. तालुक्याच्या दक्षिण टोकाला असणा-या पळसुंदे गावातील डोंगरावर उगम पावणा-या कृष्णावंती नदीवरील हा प्रकल्प आहे. ही नदी पुढे पुणे जिल्ह्यात वाहात जाते. २ हजार ४४२ सहस्र घनमीटर साठवणक्षमता असणाऱ्या या तलावाच्या कामास मे २००१ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तेव्हा त्याचा खर्च ४ कोटी ५८ लाख रुपये होता. पण या ना त्या कारणाने प्रकल्पाचे काम रेंगाळले. ऑक्टोबर २०११ मध्ये १८ कोटी ४० लाख रुपये खर्चास प्रथम सुधारित मान्यता देण्यात आली. बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली वाढ, भूसंपादनाची वाढलेली किंमत तसेच अपुरे सर्वेक्षण व अन्वेषण या व अन्य कारणांमुळे प्रकल्पाच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाने २८ कोटी ३ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केला होता. शासनाने त्यास नुकतीच मान्यता दिली आहे. तीन वर्षांत या योजनेचे काम पूर्ण करावयाचे आहे. आदिवासी दुर्गम क्षेत्रात असलेल्या या योजनेसाठी पाणीसाठा निर्मितीसंबंधीचे निकष काही प्रमाणात शिथिल करून विशेष बाब म्हणून द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
मधुकरराव पिचड आदिवासी विकासमंत्री झाल्यानंतर बारा वर्षे रखडलेल्या या योजनेवरची धूळ झटकली गेली व प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. या योजनेसाठी ८ कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते लवकरच प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.