राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्य़ात दि. १९ व दि. २३ जानेवारी अशी दोन दिवस राबवली जाणार आहे. मोहिमेत पाच वर्षांपर्यंतच्या एकूण ४ लाख ५७ हजार ५९१ बालाकांना डोस पाजण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली.
नगर महापालिका हद्दीतील ४६ हजार ८७३ बालकांना डोस पाजण्याचे उद्दिष्ट आहे, त्यासाठी नगर शहरात १७९ बूथ, २२ ट्रांझिट टीम व फिरती पथके आहेत, त्यात ६२५ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. बालक आजारी असले व नवजात असले तरी डोस पाजायचा आहे. शहर पोलिओमुक्त होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संग्राम जगताप व आयुक्त विजय कुलकर्णी यांनी केले.
ग्रामीण भागात ३ लाख ५६ हजार ७४९ व शहरी भागात ५४ हजार ८४३ बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्य़ात एकूण २ हजार ५४६ बुथ, ७ हजार ६११ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. बुथवर वंचित राहिलेल्या बालकांना २१ जानेवारीपासून ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात घरोघरी भेट देऊन डोस पाजले जाणार आहेत. ४५९ फिरत्या पथकाद्वारे बसस्थानक, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे येथे व ९८ पथकांद्वारे ऊस तोडणी, स्थलांतरित व रस्त्यांवरील मजुरांच्या बालकांना डोस दिले जाणार आहेत. शहरी भागात रात्रीही पथके असतील.
पल्स पोलिओ कृती दलाची बैठक डॉ. गांडाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात एकही बालक वंचित राहणार नाही, यासाठी नियोजन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अविनाश आहेर, संदीप सांगळे, मनपाचे डॉ. सतीश राजुरकर, इमाचे डॉ. शहनाज, रोटरीचे गणेश नरोटे आदी उपस्थित होते.