दीपावलीच्या काळात भेसळयुक्त मिठाई व तत्सम पदार्थाचे सावट दाटत असते. भेसळयुक्त साहित्य आरोग्याला अपायकारक ठरू शकते. भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी ग्राहकाला अस्सल माल मिळेल याची शाश्वती नसते. या पाश्र्वभूमीवर, यंदाची दिवाळी आरोग्यदायी पद्धतीने साजरी व्हावी याकरिता शहरातील तीन वैद्यांनी पुढाकार घेतला आहे.
शहरातील प्रशांत टोपे, सुयोग भवरे, दिनेश पंचभाई, वैभव सोनार या वैद्यांनी दीपावली व अभ्यंगस्नान याचे महत्व अधोरेखीत केले आहे.
भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात अभ्यंग स्नानाला विशेष महत्व आहे. त्यामुळे आपली त्वचा, स्नायु व शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अभ्यंग स्नानामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. स्नायु व त्वचा बळकट होतात. शरीरावर तेज येते. त्वचा सतेज बनते, झोप शांत लागते. थकवा जाणवत नाही. शरीर निरोगी होते. एकूणच, आरोग्याच्या दृष्टीने त्वचाविकारांवर योग्य उपचार घेणे, त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. निरोगी त्वचेचे रक्षण करण्यासोबत त्वचेची निगा योग्य प्रकारे राखली जावी यासाठी आयुर्वेदात अभ्यंग स्नानाला महत्व सांगितले आहे, असे वैद्य भवरे यांनी सांगितले.
हिवाळ्यात वातावरणातील रूक्षतेमुळे त्वचा रुक्ष व फुटीर होते. त्यामुळे या ऋतुत त्वचा विकार होण्याचा अधिक संभव असतो. तसेच पूर्वीपासून असणारे, सुप्तावस्थेत असणारे त्वचाविकार बळावण्याचा संभव हिवाळ्यात जास्त असतो. त्यामुळे आयुर्वेदीय उपायांनी त्ववेची काळजी घेणे हितावह ठरते. केवळ दिवाळीसारख्या मंगलप्रसंगी अभ्यंग स्नान न करता हिवाळ्यासह सर्व ऋतुत रोजच अभ्यंग स्नान करावे, असे आयुर्वेदाने सांगितले आहे. अभ्यंगासाठी विविध औषधांनी सिद्ध केलेली तेल वापरली जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळी तेल वापरतात.
वात प्रकृतीची त्वचा रुक्ष व फुटीर असते. पित्त प्रकृतीची पिन्गट, सुकुमार असते. कफ प्रवृत्तीची त्वचा पांडुरकी, स्नेहयुक्त असते. अशा वेगवेगळ्या त्वरेच्या आरोग्यासाठी वेगवेगळी तेल वापरावी, असे आवाहन वैद्य पंचभाई यांनी केले आहे. या चारही वैद्यांनी बाजारात दिवाळीच्या काळात होणाऱ्या भेसळीचे प्रमाण पाहता निव्वळ आरोग्यदायी असे अभ्यंग तेल, सुवासिक उटणे व अत्तर तयार केले आहे.