अक्षरबंध प्रकाशनच्या वतीने येथील कुसुमाग्रज स्मारकमध्ये आयोजित कार्यक्रमात चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
व्यासपीठावर ग्रंथदालनचे संचालक वसंत खैरनार, अक्षरबंध मासिकाचे संपादक व प्रकाशक प्रवीण जोंधळे, जऊळके दिंडोरीचे दिलीप जोंधळे तसेच चारही पुस्तकांचे लेखक उपस्थित होते. या वेळी पाटील यांनी मोठे साहित्य एकदम जन्माला येत नाही. त्यामुळे अक्षरबंध प्रकाशनने आयोजित केलेला हा कौटुंबिक प्रकाशन सोहळा कौतुकास्पद असल्याचे सांगितले. अशोक कन्सारा यांचे महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे प्रवास वर्णन ‘मूक मनाचे मंथन’, सुमेधा देशपांडे यांचा लहान मुलांच्या भाव विश्वातील बाल काव्यसंग्रह ‘छोटय़ांचे अंगण, देविदास खडताळे यांचा शब्द या विषयावरील काव्यसंग्रह ‘शब्दांकित’ तसेच सीमा महाबळ यांचा आजच्या युवा पिढीला उद्देशून विविध सामाजिक समस्यांवर आपल्या भावना व्यक्त करणारा काव्यसंग्रह ‘जागृती’ यांचे प्रकाशन विनायकदादा पाटील आणि वसंत खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक प्रवीण जोंधळे यांनी केले. सूत्रसंचालन कल्याणी देशपांडे यांनी केले. आभार योगेश विधाते यांनी मानले.