25 September 2020

News Flash

महिलेसह चौघे लाचखोर तीन सापळ्यांत अडकले

जिल्ह्य़ात सोमवारी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार लाचखोरांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. खरोखरच ‘पैसे खाणे’, असा प्रकार घडल्याने लाचलुचपत खात्याचे अधिकारीही चकित

| October 1, 2013 01:52 am

जिल्ह्य़ात सोमवारी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार लाचखोरांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
मनपाच्या कर आकारणी विभागातील शिपाई संतोष जाधव, खुलताबाद येथे वन विभागात काम करणारे मजूर बबन अंबादास सोनवणे, वनपाल नामदेव धोंडिबा पवार, तर वैजापूर तालुक्यातील वाघलगाव येथे तलाठी म्हणून काम करणाऱ्या कुमारी जयनंदा यशवंतराव लोखंडे या चौघांना तीन सापळ्यांमध्ये पकडण्यात आले.
मनपाच्या कर आकारणी विभागात काम करणाऱ्या शिपायास २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक झाली. आपण पकडलो गेलो, असे लक्षात येताच या महाभागाने हजार रुपयाच्या २५ नोटा गिळण्याचा प्रयत्न केला! त्यातील एक नोट पोटातही गेली. खरोखरच ‘पैसे खाणे’, असा प्रकार घडल्याने लाचलुचपत खात्याचे अधिकारीही चकित झाले. ‘ती’ नोट काढण्यासाठी आरोपी संतोष जाधव यास रुग्णालयात दाखल करावे लागले.
शहराच्या रोशनगेट भागात राहणाऱ्या इशरतखान जाहेरखान यांच्या भावाच्या इमारतीस कर आकारणी विभागाकडून १ लाख १२ हजार रुपये कर लावण्यात आल्याचे आरोपी संतोष जाधव याने सांगितले. हा कर कमी करायचा असेल तर ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता २५ हजार रुपये घेताना त्याला ताब्यात घेतले. आमखास मैदानाजवळील सिटी क्लब येथे दुपारी तीन वाजता जाधव यास पकडल्यानंतर नोटा गिळून तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. सापळा लावणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याला चपळाईने पकडले. या वेळी झटापटीत पथकातील पंच व अधिकाऱ्याला मारही लागला. पकडलेल्या आरोपीच्या तोंडातून नोटा काढून घेण्यात आल्या. सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
वन खात्याने दाखल केलेल्या गुन्ह्य़ातील ट्रॅक्टर जप्त न करण्यास शेख शौकत शेख बशीर याच्याकडे वनपाल नामदेव पवार याने ३८ हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील १० हजार रुपये स्वीकारून ते वनमजूर बबन अंबादास सोनवणे याच्याकडे दिले. दुपारी सव्वाचारच्या सुमारास खुलताबाद वनक्षेत्र कार्यालयाच्या समोर लाच स्वीकारताना दोघांना अटक झाली. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वैजापूर तालुक्यातील वाघलगाव येथे तलाठी जयनंदा यशवंत लोखंडे हिने जमिनीचा फेरफार वारसाहक्काने नोंदविण्यासाठी १ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारली. उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दुपारी २ वाजता लोखंडे हिस अटक करण्यात आली. पंढरीनाथ फकीरचंद मतकर यांनी वारसाहक्काची नोंद केली जावी, या साठी अर्ज केला होता. पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी ही कारवाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 1:52 am

Web Title: four corrupt arrested
टॅग Arrested
Next Stories
1 विचार विकास मंडळाचा वाद चिघळला
2 शेतीच्या एका आवर्तनासाठी सव्वापाच टीएमसी पाण्याचा प्रयत्न
3 ‘साखर कारखान्यांना बिनव्याजी दहा हजार कोटींचे कर्ज द्यावे’
Just Now!
X