औरंगाबादमध्ये ९ बसवर झालेली दगडफेक, तसेच हिंगोली, जालना व परभणी येथे दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता मराठवाडय़ात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘रास्ता रोको’ अवघ्या १०-१५ मिनिटांत उरकला गेला. राज ठाकरे यांच्या अटकेच्या वृत्ताचे औरंगाबाद शहरात पडसाद उमटले. शहर बससेवेला मनसैनिकांनी लक्ष्य केले. काही ठिकाणी मोठय़ा वाहनांच्या चाकामधील हवा सोडून दिल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती. बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्य़ांत आंदोलन शांततेत झाले. आंदोलनात सहभागी झालेल्या साडेआठशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
औरंगाबाद शहरातील महानुभव चौकात मनसे कार्यकर्ते सकाळी रास्ता रोकोसाठी जमले. पोलिसांनी त्यांना १० मिनिटे घोषणाबाजी करू दिली. तत्पूर्वी वाहतुकीला मोठा अडथळा होऊ नये, याची तजवीज पोलिसांनी केली होती. तरीही मोठी वाहने थांबल्याने वाहतूक बराच वेळ खोळंबली. एकीकडे आंदोलनातील कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत होते, तर दुसरीकडे शहराच्या काही भागात मोजक्या कार्यकर्त्यांनी शहर बसवर दगडफेक केली. शिरपूर-औरंगाबाद ही बाहेरगावाहून आलेली एस. टी. बस वगळता शहरातील बसवर दगडफेक करण्यात आली. समोरच्या काचेवर दगड मारून पळणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शहरातील दलालवाडी भागात टायरला आग लावून वाहतूक अडविण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी योग्य खबरदारी घेतल्याने तातडीने तणाव निवळला. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, या साठी चौकाचौकात पोलीस उभे होते. दिवसभर चौकाचौकात चोख बंदोबस्त तैनात होता. लातूर शहरानजीक टोलनाका नसल्याने मनसैनिकांनी विविध ठिकाणी रास्ता रोको केला. पण तो काही मिनिटांचाच होता. असेच स्वरुप उस्मानाबाद जिल्ह्य़ातील होते. या जिल्ह्य़ातील येणेगूर टोलनाक्यावरील गैरप्रकाराचा उल्लेख राज ठाकरे यांनी नुकताच त्यांच्या भाषणात केला होता. तथापि, जिल्ह्य़ात टोल आंदोलन शांततेत झाले. नांदेडमध्येही रास्ता रोको शांततेत झाला.
जालना जिल्ह्य़ातील तीर्थपुरी व कुंभार पिंपळगाव परिसरात एस. टी. बसवर दगडफेक झाली, तर हिंगोली जिल्ह्य़ात धानोरा-हिंगोली व माहूर-औरंगाबाद या गाडय़ांवर दगडफेक झाली. हिंगोलीत १७८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. बीड जिल्ह्य़ात काही ठिकाणी वाहनांमधून हवा सोडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्य़ात रास्ता रोको शांततेत झाला.