ओझर विमानतळावर रंगलेल्या मद्य पार्टी प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील कोणावर कारवाई होणार याकडे सर्वाचे लक्ष असतानाच चार अभियंत्यांच्या निलंबनाचे वृत्त आल्यावर मात्र संबंधितांना बळीचा बकरा बनविण्यात आल्यापासून ते काही विशिष्ट अधिकाऱ्यांना कारवाईच्या फेऱ्यातून सहीसलामतपणे बाहेर काढण्यात आल्यापर्यंतच्या चर्चेने जोर पकडला आहे. या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबनाच्या कारणाबद्दल नाशिक कार्यालयाला काही माहिती नसल्याचे सांगून अनभिज्ञता दर्शविली. ओझर विमानतळाचे काम हे ज्या उपविभागांतर्गत येते, त्यातील एकाही अधिकाऱ्याचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश नसल्यामुळे समस्त अधिकारी व कर्मचारी बुचकळ्यात पडले आहेत. निलंबनाची कारवाई ओझर विमानतळावरील मद्यपार्टी प्रकरणी आहे की अन्य काही कारणास्तव याची स्पष्टता झालेली नाही.
लढाऊ विमानांची बांधणी होणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेडच्या परिसरातील ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम आणि ठेकेदार यांच्या रंगलेल्या मद्य पार्टीने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाशिकच्या बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता डी. टी. भदाणे, शाखा अभियंता गडाख, सहाय्यक अभियंता चांदवड आणि शाखा अभियंता एम. यु. मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे. विमानतळावरील पार्टी संबंधितांना भोवल्याची चर्चा असली तरी निलंबनाचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. हे अभियंते त्र्यंबक व चांदवड या उपविभागांतर्गत काम करत होते. संबंधितांचा ओझर विमानतळावरील मद्यपार्टीशी कसा संबंध जोडला याची चर्चा होत आहे. काही जणांच्या म्हणण्यानुसार बडय़ा अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी संबंधितांना बळीचा बकरा बनविला गेल्याचे सांगितले जाते. ओझर विमानतळाचे काम ज्या उपविभागाच्या अखत्यारीत येते, त्यातील एकाही अधिकाऱ्याचा कारवाई झालेल्यात समावेश नसल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे. मुळात, जे अभियंते निलंबित झाले, त्याची कारणे काही वेगळी असू शकतात. ओझरच्या पार्टी प्रकरणात त्यांचा थेट संबंध होता, त्यांच्याऐवजी भलतीच नावे समोर आल्यावर बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना धक्का बसला. या संदर्भात या विभागाचे अधीक्षक अभियंता डी. डी. उकिरडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निलंबनाबाबत कार्यालयात कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. संबंधितांचे निलंबन हे ओझर विमानतळाच्या पार्टीशी निगडीत आहे काय यावर काही सांगता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संवेदनशील परिसरात आयोजिलेल्या पार्टीच्या आयोजकास अटक झाली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी पार्टीत उत्स्फुर्तपणे सहभागी झाले, त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे राजकीय पक्षांकडून आंदोलनांचे सत्र सुरू आहे. बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या निवृत्तीनिमित्त उशिरापर्यंत रंगलेल्या पार्टीत कर्कश डिजेचा आवाज, मद्यपानासह महिलांच्या नाचगाण्याचाही कार्यक्रम झाला होता. विमानतळावरील पार्टीसाठी बिल्डर असोसिएशनने उत्पादन शुल्क विभागाकडे १२, ५०० रुपये तर बांधकाम विभागाकडे १० हजार रुपये शुल्क भरले होते. याच आधारे रितसर परवानगी घेऊन पार्टी आयोजित केल्याचा दावा संबंधितांकडून केला गेला. तथापि, विमानतळावरील टर्मिनल इमारत शासकीय असून या ठिकाणी पार्टीला परवानगी कशी दिली गेली, यावरून बांधकाम विभाग अडचणीत आलाोहे. शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली. या चौकशीच्या आधारे निलंबनाची कारवाई झाल्याचे सांगितले जाते. बडय़ा अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी इतरांना बळीचा बकरा बनविण्यात आल्याची चर्चा आहे. विमानतळावरील पार्टीला रितसर परवानगी देणारे, पार्टीत उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविणारे अनेक जण कारवाईच्या परिघाबाहेर राहिल्याची खदखद कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.