काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला विदर्भात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळी परिस्थितीतही सरकारकडून मदत मिळत नसल्याने शेतक ऱ्यांमध्ये नैराश्य येत असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.  
यवतमाळ जिल्ह्य़ातील बोथबोडन येथील शेतकरी वसराम राठोड, वर्धा जिल्ह्य़ातील नंदोरी येथील सुरेश अंबरवेले व लोणारा येथील विनोद  महाकुलकर आणि वाशीम जिल्ह्य़ातील वाघोळा येथील संजय गावंडे या चार शेतक ऱ्यांनी नापिकी व कर्जबाजाराीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपविली. दोन दिवसापूर्वीच यवतमाळ जिल्ह्य़ातील धानोरा येथील प्रमोद पोतराजवार व सावळेश्वर येथील बाबुराव रावते यांनी आत्महत्या केल्या.
विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र पुन्हा सुरू  झाले आहे. यावर्षी विदर्भात ६९८ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिली.
शेतक ऱ्यांच्या आत्महत्या सरकारच्या उदासीन धोरणामुळे होत असून विदर्भातील २० लाख एकरातील कापूस, सोयाबीन व धानाची नापिकी झाल्यानंतर सरकारने घोषित केलेली मदत न दिल्यामुळे आत्महत्या होत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ातील बोथबोडन येथील शेतकरी वसराम राठोड यांनी केलेली गावातील २४ वी आत्महत्या आहे. त्यांच्याकडे पाच एकर जमीन असून दोन लाख रुपयांचे कर्ज आहे.
यावर्षी जेमतेम पाच क्विंटल कापूस झाला आहे. कापसाच्या गंजीवरच त्यांनी जीवनयात्रा संपविल्याचे गावाचे सरपंच बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले. आजपर्यंत बोथबोडनला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, श्री श्री रविशंकर, योजना आयोगाचे पथक, राष्ट्रीय कृषी आयोगासह २५ च्यावर समित्यांनी भेट दिली आहे, पण शेतकरी विधवांचे अश्रू पुसण्यासाठी सरकारने कोणतीच मदत केली नाही. समित्यांचे सदस्य व नेत्यांसमोर आम्ही व्यथा मांडल्या, परंतु आमचे राजकारण करून नेत्यांनी स्वत:चे पुनर्वसन केल्याचा आरोप सरपंच चव्हाण यांनी केला. वर्धा जिल्ह्य़ात ऑक्टोबरमध्ये दहा तर नोव्हेंबरमध्ये तीन शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती शेतकरी नेते प्रशांत इंगळे यांनी दिली.
पिके संपूर्ण नष्ट झालेली असताना सरकार मात्र मदत देण्यास तयार नसल्यामुळे शेतकरी अधिक नैराश्यात जात असल्याचा आरोप त्यांनी केला.