औरंगाबाद-अहमदनगर राज्यमार्ग क्रमांक ६० वरील नगरनाका ते गोलवाडी या ३.४० किलोमीटरच्या रस्ता चौपदरीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला. संरक्षण विभागाकडील २१.६६ एकर जमीन हस्तांतरणाच्या करारावर मंगळवारी सह्य़ा करण्यात आल्या. औरंगाबादचे लष्करतळ प्रमुख ब्रिगेडियर सुरेंद्र पावामनी व जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी करारावर सही केली. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सी. पी. जोशी आदींची या वेळी उपस्थिती होती. अरुंद मार्गामुळे या परिसरात नेहमीच अपघात होतात. यात आतापर्यंत तब्बल दोनशेवर बळी गेले आहेत. या निर्णयामुळे जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल.
या रस्त्याच्या चौपदरीकरणास ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पावसाळा संपताच वर्षभरात हे काम पूर्ण केले जाईल, असे मुख्य अभियंता जोशी यांनी सांगितले. लष्कराच्या ताब्यात असणाऱ्या २१.६६ एकर जमिनीची किंमत ५ कोटी ८१ लाख रुपये होते. राज्य सरकारने या जागेच्या बदल्यात निजाम बंगला येथील ३ कोटी ६४ लाख रुपये किमतीची जागा संरक्षण विभागाला दिली. करारानुसार जिल्हा प्रशासनामार्फत १२.३२ एकर शासकीय जमीन देण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ४ हजार २२६ मीटर लांबीची संरक्षण भिंत बांधणे, अस्तित्वातील आरओबीच्या पोच मार्गातून भुयारीमार्ग बांधणे, परिसर सुशोभीकरण, ३०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण, रस्ता ओलांडण्यास दुहेरी मार्ग, तसेच शहीद स्मारकाची रेल्वे स्टेशन रस्त्यावरील वॉकिंग पार्क परिसरात उभारणीची कामे हाती घेतली जातील, असे विभागीय आयुक्त जयस्वाल यांनी सांगितले.
छावणी परिसरातील शहीद स्मारक अयोध्यानगरी येथील वॉकिंग पार्कमध्ये हलविणार असल्याचे लष्करतळ प्रमुख सुरेश पावामनी यांनी सांगितले. अपघातामुळे रस्त्याचे चौपदरीकरण कसे आवश्यक आहे, हे वरिष्ठांना पटवून द्यावे लागल्याचे या वेळी सांगण्यात आले. अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावरील चौकात उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाची जागा कमी आहे. त्यामुळे त्याची देखभाल दुरुस्ती करण्यातही अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे हे स्मारक आता हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
अधीक्षक अभियंता हेमंत पगारे, कार्यकारी अभियंता विवेक दुबे, संरक्षण विभागाचे कर्नल इरफान एम. अब्दी, एम. के. शाही, श्रीवास्तव, छावणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे, तहसीलदार विजय राऊत आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.