News Flash

चंद्रपूर जिल्ह्य़ाचे १ ऑगस्टपासून ४ नवे उपविभाग

या जिल्ह्य़ाचा वाढता पसारा लक्षात घेता येत्या १ ऑगस्टपासून मूल-सावली, गोंडपिंपरी-पोंभूर्णा, बल्लारपूर व चिमूर-सिंदेवाही या चार नवीन उपविभागाची निर्मिती करण्यात येत आहे.

| June 18, 2013 09:08 am

या जिल्ह्य़ाचा वाढता पसारा लक्षात घेता येत्या १ ऑगस्टपासून मूल-सावली, गोंडपिंपरी-पोंभूर्णा, बल्लारपूर व चिमूर-सिंदेवाही या चार नवीन उपविभागाची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाला तसे पत्र पाठविण्यात आले असून याची अधिकृत घोषणा लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करणार आहे.
औद्योगिकदृष्टय़ा झपाटय़ाने विकास होत असलेल्या या जिल्ह्य़ाचा पसारा वाढत आहे. आज या जिल्ह्य़ात पंधरा तालुके असून केवळ चार उपविभाग आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना साध्या कामासाठी सुध्दा उपविभाग किंवा जिल्हा कार्यालयात यावे लागते. लोकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी व गावांची सुरळीत विभागणी करण्यासाठी शासनाने या जिल्ह्य़ात चार नवीन उपविभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास वष्रेभरापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, आजवर त्याची अंमलबजावणीच झालेली नव्हती. परंतु, आता राज्य शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून येत्या १ ऑगस्टपासून मूल-सावली, गोंडपिंपरी-पोंभूर्णा, बल्लारपूर व चिमूर-सिंदेवाही या चार नवीन उपविभागाची निर्मिती करण्यात येत आहे.
जिल्ह्य़ात सध्या चंद्रपूर, वरोरा, ब्रम्हपुरी व राजुरा, असे चार विभाग आहेत. चंद्रपूर उपविभागात चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, सावली, गोंडपिंपरी व पोंभूर्णा या सहा जिल्ह्य़ांचा, राजुरा उपविभागात राजुरा, कोरपना व जिवती या तीन तालुक्यांचा, ब्रम्हपुरी उपविभागात ब्रम्हपुरी, सिंदेवाही व नागभीड या तीन तालुक्यांचा, तर वरोरा उपविभागात वरोरा, भद्रावती व चिमूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. परंतु, आता नव्याने होणाऱ्या या चार उपविभागात केवळ दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. चिमूर व सिंदेवाही या दोन तालुक्यांसाठी चिमूर उपविभाग राहणार आहे. या दोन्ही तालुक्यातील गावांना चिमूर उपविभागाशी जोडण्यात आले आहे, तर गोंडपिंपरी व पोंभूर्णा या दोन तालुक्यांचे मिळून गोंडपिंपरी येथे उपविभागीय कार्यालय राहणार आहे. या दोन्ही तालुक्यातील गावांना गोंडपिंपरी उपविभागीय कार्यालयाशी जोडण्यात येणार आहे, तर मूल-सावली या दोन तालुक्यांसाठी मूल येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय व बल्लारपूर तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय राहणार आहे.
या स्वतंत्र चार नवीन उपविभागामुळे ग्रामीण भागातील लोकांना काम करणे सहज सोपे होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना उपविभागीय कार्यालयाशी केवळ शेतजमिनीची कामे, तसेच विद्यार्थ्यांंची कागदपत्रे तयार करण्याच्या कामासाठीच जावे लागते. यासोबतच उपविभागीय न्यायदंडाधिकारी कार्यालयात केसेस प्रकरणात हजेरी लावावे लागते. आता ही सर्व कामे संबंधित उपविभागात होणार असल्याने लोकांना त्याचा लाभ होणार आहे.
आजवर उपविभागीय अधिकारी प्रत्येक तालुक्याच्या कामासाठी एक दिवस ठरवून द्यायचे. मात्र, आता स्वतंत्र उपविभागामुळे उपविभागीय अधिकारी येणार असल्याने कामे अधिक सोयीची होतील.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासंदर्भात लवकरच घोषणा करणार असून १ ऑगस्टपासून ही सर्व कार्यालये सुरू होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.
उपविभागीय कार्यालयासाठी गोंडपिंपरी, चिमूर, मूल व बल्लारपूर येथे इमारतही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ कर्मचारी व   उपविभागीय    अधिकारी   यांचीच प्रतीक्षा    असल्याचे    संबंधित   सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2013 9:08 am

Web Title: four new sub subdivision of chandrapur distrect from first augest
टॅग : Chandrapur,Loksatta,News
Next Stories
1 सीबीआय धाडींनी नागपुरात खळबळ
2 अण्णासाहेब पारवेकरांची आता ‘काँग्रेसबरोबर सलगी
3 यंदाच्या निवडणुकीत ५० टक्के दलितेतर उमेदवारांना तिकीट
Just Now!
X