नेरुळ रेल्वेस्थानकासमोर दुकानांमध्ये आज दुपारी पावणेएकच्या सुमारास लागलेल्या आगीत चार दुकाने आणि नऊ झोपडय़ा जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. वाशी, सीबीडी आणि नेरुळ अग्निशमन केंद्राच्या चार फायर इंजिनच्या मदतीने जवानांना तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यास यश आले. रेल्वेस्थानकासमोरील मुख्य रस्त्याला लागूनच ही दुकाने आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास दुकानामागे असलेल्या झोपडपट्टीला आग लागली. काही क्षणातच आगीने जोर पकडला. या आगीच्या लपटय़ात पुढच्या बाजूला असलेली दुकानेदेखील आलीत. या दुकानांमध्ये फर्निचर, कापडी बॅग आदी साहित्य असल्याने आगाने अधिक जोर पकडला. दुकानामधील कामगार तातडीने बाहेर पडले. काहींनी दुकानातील साहित्य बाहेर काढण्याचा पयत्न केला. या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षतेच्या दृष्टीने काही वेळ थांबविण्यात आली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या वाशी, सीबीडी आणि नेरुळ अग्निशमन केंद्राच्या फायर इंजिन आणि वॉटर टँकरच्या साह्य़ाने आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र दुकानांमध्ये लाकडी साहित्य अधिक असल्याने आगीचा जोर वाढला होता. दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यास जवानांना यश आले. आग वेळीच आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी दिली.