महापालिकेच्या डोंबिवली येथील ग्रंथसंग्रहालयातील पुस्तकांचे गेल्या चार वर्षांपासून बाइंडिंग रखडल्याने अनेक वाचनीय पुस्तके खराब होऊ लागल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.
डोंबिवली येथील महापालिकेच्या ग्रंथालयात ४७ हजार विविध प्रकारची पुस्तके तसेच ग्रंथ आहेत. या ग्रंथसामुग्रीत दरवर्षी नव्याने दीड ते दोन लाख रुपये किमतीच्या पुस्तकांची भर पडत असते. नव्याने खरेदी करण्यात येणारी पुस्तके सुस्थितीत राहावीत म्हणून दरवर्षी या पुस्तकांना बाइंडिंग केले जाते. या कामासाठी सुमारे ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. मात्र गेल्या चार वर्षांपासून बायडिंगच्या कामाच्या निविदा भांडार विभागाकडून काढण्यात आलेल्या नाहीत. ग्रंथसंग्रहालयातील ग्रंथपाल कर्मचारी उपलब्ध निधीतून दरवर्षी स्वबळावर दोनशे ते तीनशे पुस्तकांना पुस्तकाच्या मुखपृष्ठांना पुठ्ठे लावून घेण्याचे काम करीत आहेत. ग्रंथसंग्रहालयाचे तीन हजार सभासद आहेत. तसेच रामनगरमधील आनंद बालभवनमधील ज्येष्ठ पत्रकार स्व. श्रीकांत टोळ यांच्या नावे सुरू करण्यात आलेले वाचनालय पुस्तकाविना पडून आहे. बालभवन उभारणीच्या मागणीसाठी टोळ यांच्या पुढाकाराने उपोषण करण्यात आले होते. हे वाचनालय पुस्तकांनी भरून जावे तसेच वाचकांची संख्या वाढावी म्हणून बालभवन व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. परंतु प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य नसल्याने कर्मचारी हतबल आहेत. महापालिकेच्या डोंबिवली ग्रंथसंग्रहालयातील पुस्तकांचे बायडिंग रखडल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक केतन दुर्वे यांनी बाइंडिंगच्या कामासाठी आपल्या नगरसेवक निधीतील दीड लाख रुपये ग्रंथसंग्रहालयाला उपलब्ध करून दिले आहेत. या निधीतून साडेतीन हजार पुस्तकांचे बाइंडिंगचे काम करण्यात येईल, असे ग्रंथपाल भालेराव यांनी सांगितले. बालभवनमधील श्रीकांत टोळ वाचनालयात पुस्तक खरेदीसाठी दुर्वे यांनी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निधी वापरण्यात येईल, असे अभियंता महेश गुप्ते यांनी         सांगितले.