तुळशीराम गायकवाड-पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय व आभा गायकवाड-पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी कन्फ्लूएन्स वार्षिक आंतरराष्ट्रीय चर्चासत्र २२ व २३ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले आहे. वर्धा मार्गावरील मोहगावातील अभियांत्रिकी महाविद्यालयात चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी २२ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता करतील. कन्फ्लूएन्ससाठी यावर्षी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया, नायजेरिया, इंग्लंड, इमिरात्स, जपान, तुर्की, येमेन, लिबिया आणि इराण या देशातून पेपर आल्याचे कार्यक्रमाच्या संयोजिका अंजली पाटील यांनी सांगितले.  टोकियोतील मेजी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मारग्रेट, युएई विद्यापीठातील लैला मौहाना आणि अमेरिकेतील डॉ. कारमन वेलिका प्रमुख वक्ता म्हणून उपस्थितांना संबोधित करणार आहेत. इंग्रजीमुळे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही केवळ संवाद साधण्यात ते अपुरे पडतात, असा अनुभव आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात प्रगतीचे दालन खुले करण्यासाठी अशाप्रकारच्या चर्चासत्रांची आवश्यकता असून तंत्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात भाषेवर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र घडवून आणणारे हे एकमेव महाविद्यालय असल्याचे गायकवाड-पाटील संस्था समूहाचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  यावेळी प्राचार्य डॉ. जी.के. आवाही, समन्वयक शुभलक्ष्मी तायवाडे, वंदना मुळे, अश्विन जयपूरकर आणि प्रतिश्रुती सिंग आदी उपस्थित होते.