तिसऱ्या श्रावणी सोमवारी प्रदक्षिणेस भाविकांची संख्या कमी झाली असली तरी ही कसर सलगच्या सुटय़ांमुळे चौथ्या सोमवारी भरून निघाली. या दिवशी मंदिरात भाविकांची अशी काही गर्दी उसळली, की पालिका प्रशासन व देवस्थानचे नियोजन कोलमडले. वास्तविक, भाविकांच्या गर्दीमुळे संबंधितांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नियोजनाची रंगीत तालीम करण्याची संधी होती. आधीच्या नियोजनातील त्रुटी शोधणे शक्य झाले असते. परंतु देवस्थान व प्रशासनाला बहुधा त्यात फारसे स्वारस्य नसावे असे एकंदर चित्र होते.
राखी पौर्णिमा व उशिराने झालेला पाऊस या कारणामुळे तिसऱ्या श्रावणी सोमवारी प्रदक्षिणेसाठी भाविकांची नेहमीप्रमाणे गर्दी झाली नाही. दरवर्षी या दिवशी चार ते पाच लाख भाविक प्रदक्षिणेत सहभागी होतात. परंतु यंदा हा आकडा दोन लाखांपर्यंत मर्यादित राहिला. पण चौथा सोमवार त्यास अपवाद ठरला. स्वातंत्र्य दिनापासून सलग आलेल्या सुटय़ांचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. नगरीतील सर्व धर्मशाळा, हॉटेल भाविकांच्या गर्दीने ‘हाऊसफुल्ल’ झाले. रविवार व सोमवारी त्र्यंबकेश्वर भाविकांनी फुलून गेला. नाशिक-त्र्यंबकेश्वर व जव्हार रस्त्यावर खासगी वाहनांची एकच गर्दी झाली. वाहनांना गावात प्रवेश मिळावा यासाठी वाहनधारकांकडून पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांची मनधरणी सुरू होती.
त्र्यंबकेश्वर मंदिरात विशेष दर्शनार्थ असणाऱ्या रांगेतही मोठी गर्दी झाली. परिणामी, त्यांची स्वतंत्र रांग लावण्यात आली. मुक्त दर्शन व विशेष दर्शन एकत्र येऊन दर्शनाचा वेग मंदावल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागला. श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे तीन वाजेपासून भाविकांनी उत्तर दरवाजा, पूर्व दरवाजा व पश्चिम दरवाजात गर्दी केल्याने रांगा शिवाजी पुतळ्यापासून कुशावर्त तीर्थापर्यंत व पूर्व मंडपातून बाहेरून निरंजनी आखाडय़ापर्यंत पोहोचल्या. पाच तास उभे राहिल्यानंतर भाविकांना दर्शन मिळत होते. स्थानिक यंत्रणा कुंभमेळ्यात काय करू शकते याची चुणूक दर्शविणारा सोमवारचा कारभार होता.
मंदिर प्रांगणात सर्वत्र लोखंडी जाळ्यांचे अडथळे आणि त्यातही एका कोपऱ्यात अडगळ साहित्य पडले होते. दर्शन व पूजेसाठी फाडल्या जाणाऱ्या पावत्यांमुळे देवस्थानला उत्पन्न मिळत असले तरी भाविकांच्या दृष्टीने सोई-सुविधांचा अभाव प्रकर्षांने जाणवला.
सिंहस्थ कुंभमेळा सात ते आठ महिन्यांवर येऊनही सुलभ दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह आदी व्यवस्था कधी होणार, हा प्रश्न आहे. पुरातत्त्व खाते निधीचा तर देवस्थान पुरातत्त्व खात्याच्या नियमांचा बागुलबुवा दाखवून कामे टाळत असल्याची भाविकांची भावना आहे. मुळातच, देवस्थानच्या मोकळ्या जागेत भाविकांसाठी उत्तम तऱ्हेची व्यवस्था पुरातत्त्व खात्याच्या नियमांच्या अधीन राहून करता येईल. पण त्यासाठी कोण पुढाकार घेईल, याकडे सर्वाचे लक्ष आहे. उत्पन्नाशी निगडित घटक त्याबद्दल अनास्था दर्शवीत असल्याचे चित्र आहे. मंदिर उघडल्यापासून ते बंद होईपर्यंत रोज होणारे वाद आणि दररोज बदलणारे नियम सर्वश्रुत आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. प्रचंड गर्दी असूनही वाहने गायत्री मंदिर परिसरातून अगदी मंदिर कोटाला खेटून लावली जातात. रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे भाविकांना पायी चालताना कसरत करावी लागते. या समस्यांवर कधी तोडगा निघणार, असा भाविकांचा प्रश्न आहे.