महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाने आयोजित केलेल्या दिवाळी बचत बाजार उपक्रमाला यंदाही पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. साडेसहाशे बचत गटांनी भाग घेतलेल्या या दिवाळी बचत बाजारात ४५ लाख रुपये एवढी विक्री झाली.
नागरवस्ती विकास योजनेचे प्रभारी प्रकल्प संचालक हनुमंत नाझीरकर यांनी सोमवारी ही माहिती दिली. बचत गटांमधील महिलांनी तयार केलेली विविध उत्पादने दिवाळीच्या निमित्ताने विक्रीसाठी ठेवली जातात. त्यासाठी नागरवस्ती विकास विभागातर्फे विशेष उपक्रमाचे आयोजन केले जाते. ‘दिवाळी बचत बाजार’ या नावाने महापालिकेतर्फे हा उपक्रम चालवला जातो. यंदा गणेश कला क्रीडा रंगमंच, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, पु. ल. देशपांडे उद्यान आणि खराडी या चार ठिकाणी हा उपक्रम करण्यात आला. या उपक्रमात साडेसहाशे बचत गट सहभागी झाले होते आणि ४५ लाख रुपयांची विक्री झाली.
या बचत बाजारांमध्ये वस्तू आणि खाद्यपदार्थ अशा दोन्हींची विक्री ३० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या काळात करण्यात आली. बचत बाजारांमध्ये दिवाळीचा फराळ, पणत्या, रांगोळी, रांगोळीचे रंग, दिव्यांच्या माळा, आकर्षक मेणपणत्या, तसेच लहान मुलांचे कपडे, कापडी पिशव्या, मसाले, गृहोपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने आदी अनेक गोष्टी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.