विविध कंपन्या परिसरातील जनतेला पैसे अल्पावधीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवीत आहेत. यात महिनाकाठी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत आहे, तर काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची चर्चा परिसरात आहे. देऊळगाव राजा तालुका व परिसरामध्ये लोकांना काही महिन्यामध्येच दामदुप्पट करून देण्याचे आमिष काही खासगी कंपन्या दाखवीत आहेत. काही कंपन्यांवर व एका बोगस पतसंस्थेवर १० ते १५ दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे.
तीन-चार वर्षांपासून देशामधील नामांकित कंपन्या शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करून कमीतकमी कालावधीत ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीवर भरपूर रक्कम मिळवून देत. मात्र, सध्या या क्षेत्रात सक्षम व बलाढय़ असणाऱ्या कंपन्या मागे सरल्या. केवळ भारतीय जीवन विमा निगम या कंपनीवर जनतेचा जास्तीत जास्त विश्वास असल्याचे पाहावयास मिळते. राष्ट्रीयीकृत बॅंका, सहकारी बॅंका, पतपेढय़ा, तसेच सहकारी पतसंस्था या ग्राहकांच्या ठेवीची दामदुप्पट साडेपाच ते सहा वर्षांमध्ये करतात. याउलट, देऊळगाव राजा तालुका व परिसरामध्ये लोकांना काही महिन्यामध्येच दामदुप्पट करून देण्याचे आमिष काही खासगी कंपन्या दाखवीत आहेत. यात विविध नावाने सुमारे पंधरा ते वीस कंपन्या सक्रिय असून यांच्या दलालांचे जाळे तालुक्यापासून ग्रामीण भागात पसरलेले आहे. या कंपन्यांच्या दलालांना कंपनी मोठय़ा प्रमाणात कमिशन देत असल्याने ते आपल्या हाताखाली आणखी एजंट बनवितात. एकप्रकारे साखळी पध्दत यात वापरली जाते. यात कंपनीचे जनरल मॅनेजर जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी आपले मुख्य दलाल नियुक्त करतात.
सर्वप्रथम या दलालांना मोठय़ा रकमेच्या कमिशनचे धनादेश व नगदी रक्कम देण्यात येते. कंपनीकडून आलिशान कार देण्यात येते. हेच दलाल आपली अल्पावधीत झालेली भरभराट आपल्या यशाची भुरळ इतर लोकांना देऊन आपल्या हाताखाली छोटेमोठे दलाल तयार करून जनतेला पैसा गुंतवणूक करण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करतात. आपली कंपनी ग्राहकांनी केलेल्या एखाद्या कंपनीचे शेअर घेणे व आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात या रकमेची गुंतवणूक करत असल्याचे पटवून देण्याचे काम हे दलाल करीत आहेत, तर सध्या देऊळगाव राजा तालुका परिसरामध्ये महिन्याकाठी कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक होत असली तरी हा गोरखधंदा दोन तीन वर्षांंपासून सुरू आहे.
सर्वप्रथम गुंतवणूक करणाऱ्या लोकांचा फायदा झाला असला तरी साखळी पध्दतीचा शेवट वेगळा होतो. सध्या तालुक्यात या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या बाबी समोर येत आहेत. या अगोदरही जनतेची गुंतवणूक करून काही खासगी कंपन्यांनी पलायन केल्याच्या घटना घडलेल्या आहे. काही कंपन्यांवर व एका बोगस पतसंस्थेवर १० ते १५ दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे, तर फसगत झाल्याने काही नागरिक पोलिसात तक्रार करीत नाहीत.