‘पालक त्रस्त, एजंट मस्ट’
विद्यार्थी संख्येअभावी महाविद्यालय ओस पडण्याची शक्यता हेरून विदर्भातील बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांवर विविध प्रलोभनांचे जाळे टाकणे सुरू केले असून आता या उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. वर्ग तुकडया टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात पायपीट करणाऱ्या ग्रामीण भागातील शिक्षकांचे चित्र नवे राहिलेले नाही. आता अभियांत्रिकी महाविद्यालयांची भरमसाठ वाढलेली संख्या व त्या तुलनेने विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांंची संख्या यात कमालीचे विसंगत प्रमाण झाले आहे. परिणामी वर्ग भरणार कसे? प्रवेश पूर्ण करणार कसे? आणि मग कमाई होणार कशी? या प्रश्नाने महाविद्यालयांच्या व्यवस्थापन ग्रासले असून यातून दलालांना हाताशी धरले जात आहे.
गत दोन वर्षांपासून प्रवेश संख्येत घसरण होणे सुरू झाले. आता मारामार सुरू आहे. यात पाश्र्वभूमीवर विद्यार्थी आणा व प्रत्येकी दहा हजार रूपये कमिशन घ्या, असे सूत्रच बहुतांश खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात दिसून येत आहे. रातुम नागपूर विद्यापिठात ६० अभियांत्रिकी महाविद्यालयं आहेत. २० हजार विद्यार्थ्यांची त्यांची प्रवेशक्षमता असून नामांकित महाविद्यालयं वगळता बहुतांश महाविद्यालयांनी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना घेरणे सुरू केले आहे. विद्यापिठाच्या अभियांत्रिकी शाखेचे माजी अधिष्ठाता व विद्यमान व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ.डी.के.अग्रवाल यांनी यास दुजोरा दिला. ते म्हणाले की प्रामुख्याने गत काही वर्षांत नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची चणचण भासते. म्हणून प्रसंगी शिक्षण शुल्क कमी करणे किंवा अन्य सवलती देण्याचा प्रकार होतो. गुणवंत किंवा प्रामुख्याने खुल्या गटातील मुलं ज्यांना शुल्क भरावेच लागते ते विदर्भाबाहेरील पूण्या-मुंबईच्या महाविद्यालयात प्रवेश घेतात. आपली महाविद्यालयं निम्मी प्रवेशक्षमताही पूर्ण करू शकत नाही. दर्जा वाढविल्याखेरीज या अशा महाविद्यालयांचे काही खरे नाही. अशी स्पष्टोक्ती प्रा. अग्रवाल यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
काही पालकांशी चर्चा केली असतांना त्यांनी जिल्हयातील सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी संपर्क केल्याचे सांगितले. वारंवार फ ोन येतात. एसएमएस मिळतात. आमच्याकडे एकदा भेट दया. बोला व मगच प्रवेश ठरवा. अशी विणवणी असते. एका महाविद्यालयाने तर अर्धीच फी भरा. वर्षभर काहीच शुल्क नाही, असेही आमिष दिले. काही पालक तर अत्यंत त्रस्त झाले आहे. यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, अमरावती या ठिकाणाहून सातत्याने फ ोन येत आहे. त्यामुळे मुलाला कुठे प्रवेश दयायचा याबाबत संभ्रमाची स्थिती असल्याचे पालक सांगतात.
या पाश्र्वभूमीवर एजंटही सक्रिय झाले आहे. एका महाविद्यालयास ४० प्रवेश मिळवून देत एका एजंटने तर पाच लाखाची कमाई गत तीन दिवसात करून टाकली. शहराच्या मध्यवर्ती भागात कार्यालय थाटून या एजंटने आरंभलेली दुकानदारी अभियांत्रिकी शाखेचे झालेले बाजारीकरण स्पष्ट करते. ग्रामीण भागातील कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात पोहोचून पालक व विद्यार्थ्यांना हे एजंट हेरतात आणि बोली लावून त्यांचे प्रवेश महाविद्यालयात करवून देतात. अशाच ग्रामीण भागातील चारशे विद्यार्थ्यांची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचे दाखले एका एजंटकडे                सदर प्रतिनिधीला दिसून               आले. वर्गतुकडया न भरल्यास प्राध्यापकांचे फोरसे नुकसान होत नाही. त्यामुळे शिक्षकांसारखी त्यांची वणवण नाही. पण खाजगी महाविद्यालयाचे कर्तेधर्ते मात्र प्रवेशासाठी चिंतातूर आहेत. उद्या, बुधवारी २६ जूनपासून प्रवेशाचा पहिला टप्पा सुरू होत आहे. त्या अनुषंगाने ‘पालक त्रस्त तर एजंट मस्त’ असे चित्र दिसून येत आहे