होळीच्या सणानिमित्त सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकाच्या पिशवीची तपासणी करण्याचे आदेश असल्याचे सांगून दोन तोतया पोलिसांनी गोंदियातील सी.जे. पटेल कंपनीच्या रोखपालाच्या बॅगची तपासणी करत असताना ७ लाखांना गंडवल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास गोंदियातील पॉल चौकात घडली.
ईश्वरभाई नरसीभाई पटेल (६३, रा. मनोहर कॉलनी, गोंदिया) असे फिर्यादी रोखपालाचे नाव आहे. गोंदिया-रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोखपाल ईश्वरभाई पटेल हे बुधवारी बँक ऑफ बडोदातून ७ लाखांची रक्कम घेऊन कंपनीकडे निघाले असताना वाटेतच दोन तोतया पोलिसांनी त्यांना थांबवून होळीनिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाची बॅग तपासण्याचे आदेश असल्याचे सांगून त्यांच्या पिशवीची तपासणी केली. तपासणी करत असताना त्यांची रक्कम गंडवल्याची तक्रार फिर्यादी ईश्वरभाई पटेल यांनी दाखल केली.
घटनेनंतर रामनगर पोलिसांनी त्वरित शहराची नाकाबंदी करून आरोपीचा शोध घेतला. मात्र, दोन्ही आरोपी पसार झाले. रागनगर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी करीत आहेत.