भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव कवाद यांच्याकडून ७ हजार रुपयांची लाच घेताना निघोज येथील कामगार तलाठी पी. एस. उचाळे यास नगरच्या लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले.
कवाद यांची सून वर्षां बाळासाहेब कवाद यांच्या नावावर ५३ गुंठे जमिनीचे वीस दिवसांपूर्वी खरेदीखत करून दिले होते. या खरेदीची नोंद करून कच्चा व पक्का सात-बारा उतारा देण्यासाठी तलाठी उचाळे याने १४ हजार रुपयांची लाच मागितली होती. आठ दिवसांपूर्वी सात हजार रुपये दिल्यानंतर उचाळे याने तात्काळ कच्चा उतारा दिला. पक्क्य़ा उता-यासाठी उर्वरित सात हजार रुपये आठ दिवसांनी घेऊन या असेही उचाळे याने कवाद यांना बजावले.
कवाद यांनी याबाबत नगर येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून उचाळे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार या पथकाने तलाठी कार्यालयाबाहेरच सापळा रचला होता. कवाद यांनी कार्यालयात जाऊन उचाळे याच्याकडे ७ हजार रुपये देतानाच पथकातील कर्मचा-यांनी त्याला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर. पी. माळी तसेच पी. आर.मोरे, श्रीपादसिंह ठाकूर, प्रमोद जरे, रविंद्र पांडे, अरूण बांगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
उचाळे याने निघोज येथे काही दिवसांपूर्वी अशीच नोंद करून उतारे देण्यासाठी एका शेतक-याकडून दीड लाख रुपये उकळल्याची माहितीही उघड झाली आहे. कुकडी नदीपात्रात बेकायदेशीररीत्या वाळूउपसा करणा-या वाळूतस्करांशी संधान साधून महिन्याकाठी उचाळे याने लाखो रुपये जमा केल्याची चर्चाही निघोज परिसरात होती. महसूल विभागाचे पथक या भागात कारवाईसाठी येणार याची खबरही उचाळे हाच वाळूतस्करांना नियमित देत असे.