अभिनेत्री जिया खानने प्रेमसंबंधातील नैराश्यामुळे आत्महत्या केली असली तरी व्यावसायिक आयुष्यात यश न मिळाल्याने ती निराश झाली होती. प्रेमसंबंधातील अपयश आणि व्यावसायिक अपयशातून आलेल्या निराशेने ती अधिक खचली आणि तिने आत्महत्या केली. बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत नशीब आजमावण्यासाठी अनेक तरुण-तरुणी मुंबईत येतात. रातोरात ग्लॅमर आणि पैसा देणारे हे क्षेत्र असले तरी प्रचंड स्पर्धेमुळे प्रत्येकाचा इथे टिकाव लागतोच असे नाही आणि त्यामुळे प्रचंड नैराश्य येते. सुपरस्टार्सही जिथे नैराश्याच्या गर्तेत सापडतात, तिथे दुय्यम दर्जाच्या अभिनेत्री आणि मॉडेल्स यांची अवस्था अगदी बिकट आणि त्याहीपेक्षा दयनीय असते. काम नाही म्हणून निराशा, ती दूर करण्यासाठी मग व्यसने, त्यातूनही मार्ग सापडत नाही म्हणून अमली पदार्थाचा विळखा आणि मग याच अमली पदार्थाच्या नशेत सेक्स करून हा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, अशी माहिती समोर आली आहे.  चंदेरी दुनिया हे जणू मायाजाल आहे. या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण-तरुणी येत असतात. मॉडेलिंग क रायचे, मग त्यातून चित्रपटात संधी मिळते का, याची चाचपणी केली जाते. पण, या चित्रपटात प्रत्येकालाच नायक-नायिकांच्या भूमिका मिळत नाहीत. आम्हाला इथे दुय्यम भूमिका मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. त्यामुळे नैराश्य येतंच, असे दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री आणि मॉडेल गहना वसिष्ठ हिने सांगितले. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी ज्या मुली येतात त्या सर्वच मोठय़ा घरातील नसतात. घरच्यांचा विरोध पत्करून त्या येतात. त्यामुळे कुटुंबाचा पाठिंबा नसतो. अशा स्थितीत मुंबईत टिकाव धरणे कठीण होते. पैसे नसतात. जीवनशैलीत बदल करता येत नाही. यामुळे नैराश्य वाढत जाते आणि मग व्यसनांचा आधार घ्यावा लागतो, असे गहनाने सांगितले.

 बरं स्ट्रगल आहे म्हणून मग शॉर्टकटचाही वापर केला जातो. काम योग्य असो वा नसो, ते केले जाते. बॉलिवूडमध्ये छोटी-मोठी कामे करणारी मॉडेल अनुमिता सुमन आपला अनुभव सांगते, ‘एकदा काम मिळाले की पुढच्या कामाची शाश्वती नसते. वारंवार निर्मात्यांच्या भेटी, प्रॉडक्शन हाऊसेसमध्ये मारलेल्या फे ऱ्या यातूनही जेव्हा नकारच येतो तेव्हा येणारी निराशा फार मोठी असते. अशावेळी झोपेच्या गोळ्या घेणे, मद्यपान, धूम्रपान केल्याशिवाय सुटकाच होत नाही, असे अनुमिताने सांगितले. मात्र, नैराश्यातून सुटका करण्यासाठी ही मंडळी अमली पदार्थच नव्हे तर पार सेक्स करण्यापर्यंतच्या तडजोडी करायला तयार होतात. ‘सेक्स’ हा माझ्यासाठी डिप्रेशन घालविण्याचा मार्ग असल्याचे एका अभिनेत्याने सांगितले. छोटी-मोठी कामे करावी लागतात. पैसे संपतात. दुसरे काम करू शकत नाही. एकदा तुम्ही पडद्यावर दिसलात की तुमच्याबद्दल चर्चा व्हायला लागते. तेव्हा एखादी छोटी-मोठी नोकरी करण्याचा पर्यायही योग्य ठरत नाही. मग इथेच मिळेल ते काम करा, अशी गत होऊन बसते. अशावेळी मी भरपूर दारू पितो. अगदी सेक्सद्वारेही माझं नैराश्य घालवण्याचा प्रयत्न करतो, अशी कबुली त्याने दिली.

नवनव्या लोकांना काम न देण्यासाठी निर्मात्यांकडेही त्यांची कारणे असतात, असे युसूफ खान नावाच्या निर्मात्याने सांगितले. चित्रपट निर्मिती हा मोठा जुगार आहे. बिग बजेट निर्मात्यांनाही हा जुगार खेळावा लागतो. पहिल्या तीन चार दिवसांत निर्मिती खर्च वसूल करायचा असतो. नव्या कलावंतांना घेण्याचा धोका अशावेळी पत्करता येत नाही, असे त्यांनी सांगितले. तर काम न मिळणे, फसवणूक होणे ही या विश्वातील नित्याची बाब. त्यामुळे निराशा येत जाते. त्याचबरोबर हातात पैसे नसणे अधिकच समस्या निर्माण करतात. मग ‘तडजोडी’ कराव्या लागतात. अमली पदार्थ घेणे ही चंदेरी विश्वातील नित्याची बाब. डिप्रेशन घालविण्यासाठी मी अमली पदार्थाचे सेवन करते असे एका अभिनेत्रीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. दिवसभराचा थकवा, प्रचंड मानसिक दबाव आणि उद्याची अस्थिरता यामुळे या अमली पदार्थाचे सेवन करावेच लागते असे तिने सांगितले.

 नैराश्य फक्त नवोदितांनाच असतं असंही नाही. रवी किशन हे भोजपुरी चित्रपटातलं प्रसिद्ध नाव. टीव्ही मालिका आणि हिंदूी चित्रपटात विविध भूमिकाही त्याने केल्या आहेत. नैराश्य स्ट्रगलर्ससाठी नव्हेच तर स्थिरावलेल्या कलाकारांसाठी मोठी समस्या असल्याचे त्याने सांगितले. काम नसते तेव्हा मनावर प्रचंड ताण असतो. त्यावेळी मी मेकअप बॉक्स उघडून त्याचा सुगंध घ्यायचो. हा मेकअप माझ्या चेहऱ्यावर कधी लागेल याचा विचार करत राहायचो. आता मी बऱ्यापैकी स्थिरावलो असलो तरी अजूनही संघर्ष संपलेला नाही. मी स्टार असलो तरी सहज कामे मिळत नाहीत. त्यामुळे निराशा येते. स्ट्रगलर्ससारखी कामे मागू शकत नाही, ही एक मोठी अडचण असते. अजूनही निर्मात्यांकडून फोन येईल याची वाट बघण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. सहा सहा महिने फोन येत नाही, मग निराशा वाढतच जाते असे तो म्हणाला. यश लवकर मिळत नाही, मिळालं तर टिकून राहात नाही आणि या संघर्षांत तो कलाकार अधिक निराश होत जातो, रवी किशनने सांगितले.