डोंबिवली शहर परिसरात शुक्रवारी सकाळी सात वाजता पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने अवचित आलेल्या पावसाने आणखी गारठा पसरला. आज सकाळी पावणेसात वाजता पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. अचानक पाऊस सुरू झाल्याने प्रत्येक घरात छत्र्यांची शोधाशोध सुरू झाली. सकाळची वेळ शाळांची असल्याने घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आज छत्री दिसत होती, तर काहींनी रेनकोट घातले होते. आधीच गार वारे त्यात पाऊस पडल्याने कुडकुडवणाऱ्या थंडीत आणखी भर पडली. दिवसभर वातावरण ढगाळ असल्याने कोणत्याही क्षणी पाऊस पडेल या भीतीने प्रत्येक रहिवासी छत्री घेऊनच घराबाहेर पडताना दिसत होता.