देशीकेंद्र शाळेत प्रवेशासाठी देणगी मागितली जात असल्याची माहिती मिळताच मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष फुलचंद कावळे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शाळेत कोंडून १०२ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यास भाग पाडले.
सोमवारी देशीकेंद्र शाळेत प्रवेशासाठी पालकांची गर्दी होती. मनसेचे कार्यकर्ते शाळेत आल्याचे लक्षात येताच संस्थाचालकांनी १७ जूननंतरच सर्वाना प्रवेश दिले जातील, असे जाहीर केले. मात्र, वरिष्ठ शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे यांना आम्हाला आश्वासन नको, प्रवेश हवा, अशी मागणी करीत मनसे कार्यकर्त्यांनी तुपे यांना शाळेच्या बाहेर जाऊ देणार नाही, असे सांगितले. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक जी. एम. धाराशिवे सायंकाळी साडेपाच वाजता शाळेत आले. त्यांनी सर्वाची बाजू ऐकून घेत प्रवेश मागणाऱ्या १०२ विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्ण केली.