विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठानचा उपक्रम
‘विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठान’च्या नाटय़पदविका अभ्यासक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्ताने गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त साधून ‘संगीत संशयकल्लोळ’चे दोन प्रयोग रसिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आले आहेत. हे नाटक प्रतिष्ठानचे पदविकाप्राप्त तरुण कलाकार सादर करणार आहेत.
श्रीकांत दादरकर दिग्दर्शित या नाटकाचे दोन प्रयोग १४ जून रोजी सायंकाळी ६.०० वाजता थोरले बाजीराव सभागृह, जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे (पश्चिम) आणि १५ जून रोजी सायंकाळी सहा वाजता काँग्रेस हाऊस सभागृह, वसई येथे आयोजित करण्यात आले आहेत.
संगीत नाटकांना मोठय़ा नाटय़गृहात अल्प प्रतिसाद मिळतो. त्यामुळे संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन जावे आणि मुंबईच्या उपनगरातून तसेच छोटय़ा गावांमधूनही या नाटकाचे प्रयोग व्हावेत या उद्देशाने अत्यावश्यक आणि सूचक नेपथ्यासह छोटय़ा रंगमंचांवरही हे नाटक सादर केले जाणार आहे, अशी माहिती विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठानच्या विश्वस्त शुभदा दादरकर यांनी दिली.