ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थानतर्फे लातूरकरांना मोफत पाणीपुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच त्याचा प्रारंभ होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी दिली.
शहराला ८ दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या पाणीटंचाई आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करावी व पाणीटंचाई आहे अशा ठिकाणी देवस्थानने पाणीपुरवठा करण्याचे आवाहन केले. या पाश्र्वभूमीवर आमदार दिलीपराव देशमुख व अमित देशमुख यांनी सिद्धेश्वर देवस्थान परिसरात उपलब्ध पाण्याचा लातूरकरांसाठी वापर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांनी मनपाला आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार महेश सावंत, मनपा पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कल्लप्पा बामणकर यांनी देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, सचिव ज्ञानोबा गोपे, रमेशसिंह बिसेन, विश्वस्त ज्ञानोबा कलमे यांच्यासमवेत देवस्थान परिसरातील विंधनविहिरी, तीर्थ तसेच सध्या युद्धपातळीवर ६० बाय ६० या काम सुरू असेल्या विहिरींची पाहणी केली. या विहिरीला मुबलक पाणी लागले असून त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ज्या सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी टँकरद्वारे लातूरकरांना मोफत पाणीपुरवठा करू इच्छितात, त्यांना देवस्थानकडून मोफत पाणी दिले जाणार आहे. हे पाणी नेऊन विकता येणार नाही, असे गोजमगुंडे यांनी स्पष्ट केले.