आजपर्यंतच्या शंभर वर्षांच्या आयुष्यात माझ्या चारित्र्यावर एकही काळा ठिपका पडला नाही आणि हे श्रेय केवळ गांधीजींनाच जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांनी येथे बोलताना केले. दत्ताजी ताम्हणे यांनी शनिवारी वयाची १०० वर्षे पूर्ण केली. यानिमित्त ठाण्यातील सी.के.पी. हॉल येथे दत्ताजींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांनी विविध विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला. तसेच ज्येष्ठ लेखक चांगदेव काळे यांनी दत्ताजींवर लिहिलेल्या ‘शतकयोगी’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शांतीभाई पटेल, समाजसेवक किशोर बेडकीहाळ, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे, मेजर सुभाष गावंड, लेखक चांगदेव काळे आणि विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे या वेळी उपस्थित होते. ‘अ‍ॅड. सूर्यकांत वढावकर कामगार सेवा ट्रस्ट’, ‘चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सोशल क्लब’ आणि ‘व्यास क्रिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आजचा काळ पाहताना कधी आनंद होतो, तर काही गोष्टींची खंत वाटते, असे त्यांनी सांगितले. आजच्या तरुण पिढीला नीट मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे दत्ताजींनी सांगितले. येत्या पाच वर्षांमध्ये ही तरुण पिढी बेकारीला कंटाळेल. याविरोधात आवाज उठवून उभी राहील आणि यातूनच एक मोठी ‘क्रांती’ घडेल, असा विश्वास दत्ताजींनी या वेळी व्यक्त केला. एकांगी जीवन जगण्यापेक्षा स्वत:ला सर्वगुणसंपन्न बनविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर आपण केवळ गुलामगिरीतून बाहेर आलो, पण त्यानंतर देशातील नागरिकांचे जीवन अपेक्षेप्रमाणे समृद्ध न झाल्याची खंत या वेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शांतीभाई पटेल यांनी व्यक्त केली. आजच्या राजकारणात प्रामाणिकपणा नाही. राजकारणी नागरिकांना दिलेली आश्वासने पाळताना दिसत नसतील तर त्या आश्वासनांचा काय उपयोग, असा सवालही पटेल यांनी उपस्थित केला. यामुळे आजच्या राजकारण्यांनी दत्ताजींकडून बरेच काही शिकावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. घटनेच्या अंमलबजावणीचा फेरआढावा घेण्याची दत्ताजींची सूचना अतिशय योग्य आहे, असे मत या वेळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी या वेळी मांडले.