News Flash

मैत्री (आणि प्रेमही) अनमोल !!

माझ्या आणि रोहितच्या मैत्रीचा अध्याय सुरू झाला, त्याला आता अकरा र्वष उलटून गेली. (पण अजूनही ही मैत्री टवटवीतच आहे!..) त्या वेळी तो अकरावीत होता आणि

| February 14, 2013 12:32 pm

माझ्या आणि रोहितच्या मैत्रीचा अध्याय सुरू झाला, त्याला आता अकरा र्वष उलटून गेली. (पण अजूनही ही मैत्री टवटवीतच आहे!..) त्या वेळी तो अकरावीत होता आणि मी नुकतीच बारावी पास झाले होते. तसं आमच्यात दीड वर्षांचं अंतर! आम्ही दोघंही ज्ञानसाधना महाविद्यालयात नाटकाच्या ग्रुपमध्ये एकत्र भेटलो. योगायोग म्हणजे आम्ही दोघं भेटलो त्याच्या काहीच दिवस आधी त्याचं त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर आणि माझं माझ्या ‘बॉयफ्रेंड’ बरोबर ‘ब्रेकअप’ झालं होतं. त्या अनुभवाच्या कडू आठवणी आम्हाला इतक्या छळत होत्या, की ‘प्रेम वगैरे काही नसतंच, सगळंच नुसत बकवास असतं..’ अशा समजुतीवर आम्ही ठामपणे येऊन थांबलो होतो. .. गंमत म्हणजे, या समजुतीतच आमच्या प्रेमाची नवी गोष्ट रुजू लागली होती!  नाटकाच्या तालमींमुळे मग आम्ही जास्तीत जास्त वेळ एकमेकांच्या सहवासात राहात होतो. नकळत हा सहवास हवाहवासा वाटू लागला आणि आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. त्या वेळी कॉलेजमध्ये आणि कॉलेजच्या बाहेरही आम्ही खूप वेळ एकत्र घालवायचो. खूप गप्पा मारायचो. वेगवेगळ्या विषयांवर भरपूर बोलायचो. मग लक्षात येत गेलं, की आमची मनंच नव्हे, तर मतंही जुळायला लागली होती. आणि आम्ही एकमेकांत गुरफटून चाललो होतो..
.. आत्ता विचार केला, तर लक्षात येतं की, दोघांपैकी कोणीच कोणालाही ‘प्रपोझ’ असं काहीच केलं नव्हतं. ‘इट जस्ट हॅपण्ड..’
काही काळ याच गुलाबी धाग्यांच्या रेशीमगाठींमध्ये आम्ही मश्गूल होतो.. काही वर्षांंनंतर आमच्यात थोडासा दुरावाही आला होता. नात्यामध्ये नाही, पण आमच्या विचारांमध्ये! मग लक्षात आलं, की प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलत असताना, असंही होतंच की!..रुसवे-फुगवे, राग-लोभ.. सारं काही होतंच असतं.. (आणि त्यातही गंमत असते! .. हे आता लक्षात येतंय.) त्या वेळी मी अशा टप्प्यावर होते की, करिअर, लग्न या सगळ्याच गोष्टींचा विचार गंभीरपणे करत होते. तर तो (दीड वर्षांनी लहान असल्यानं असेल कदाचित) अजूनही मौजमजेच्याच मूडमध्ये होता. आम्ही तब्बल आठ महिने एकमेकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. पण जाणवलं की, लांब राहिलो तरीही मैत्री आणि बंध तसेच घट्ट आहेत. त्या आठ महिन्यांनी आमच्या नात्याचा पाया खूप भक्कम केला.
आता नोव्हेंबर २०११ मध्येच आम्ही दोघंही लग्नाच्या रेशीमगाठीत गुरफटून गेलो आहोत. या एक वर्षांच्या काळात नवरा-बायको म्हणून एकमेकांबरोबर वावरताना आमच्यातलं मैत्रीचं नातं आजही अबाधित आहे. दहा वर्षांपूर्वी आम्ही ‘अफेअर’ या उद्देशाने एकत्र आलो असतो, तर हे बंध किती टिकले असते, याबाबत शंका आहे. पण आमच्यातल्या मैत्रीच्या धाग्याने आम्हाला खूप घट्ट बांधून ठेवलंय. काही मुली स्वत:च्या नवऱ्यामध्ये एक मित्र शोधायचा प्रयत्न करत असतात. काहींना तो मिळतोसुद्धा! पण माझं नशीब एवढं चांगलं आहे की, माझ्या मित्रातच मला नवरा मिळाला.. आमच्यातली मैत्री जपणारा..
    
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 12:32 pm

Web Title: friendship and love is precious
टॅग : Love,Valentine Day
Next Stories
1 ‘अँप्स’मय व्हॅलेन्टाइन
2 माऊ आणि मन्या!
3 मनाचा पिसारा..!
Just Now!
X