विविध तक्रारींच्या नावाखाली रास्तभाव दुकानाचे निलंबन करणे, परवाने रद्द करणे यामुळे धान्याची उचल करताना मोठय़ा प्रमाणावर काळा बाजार होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. प्रत्येक गावात रास्तभाव दुकानची व्यवस्था करावी, या मागणीसाठी १ जानेवारीपासून बेमुद्दत उपोषण करण्याचा इशारा रिवद्र गडदे यांनी दिला आहे.
जिल्ह्यात रास्तभाव दुकानच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात तक्रारी होत आहेत. त्याकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. तक्रारीच्या नावाखाली रास्तभाव दुकानाचे निलंबन, परवाने रद्द करणे, असे प्रकार दिवसेदिवस वाढत गेल्याने या दुकानातील उचल अन्य दुकानांकडे दिली जाते. दुकान जोडून पर्यायी व्यवस्था करण्यात येते. मात्र, त्यासंदर्भात अनेक गावच्या ग्रामस्थांना या कार्यवाहीबाबत कोणत्याच प्रकारची माहिती दिली जात नाही. इतर दुकानाशी जोडलेल्या दुकानांतून त्या गावांना धान्याचा साठा, केरोसीन वाटप केले जात नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.  
औंढा नागनाथ तालुक्यात सुमारे २७ रास्तभाव दुकानदारांविरूध्द तक्रारी आहेत. सेनगाव तालुक्यात १२ दुकाने इतरत्र जोडून पर्यायी व्यवस्था केली आहे. कळमनुरी तालुक्यात ४० दुकाने पर्यायी व्यवस्थेवर आहेत. परिणामी काळाबाजार होत असल्याने आंदोलनाची भूमिका घेतल्याचे गडदे यांनी सांगितले.
तालुकास्तरावर नाममात्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, दक्षता समितीच्या बठका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे अनेकवेळा चुकीच्या तक्रारीवरून अहवाल पाठविला जात असल्याचा आरोप यांनी निवेदनाद्वारे केला.