नगर शहरात गेले तीन महिने सुरू असलेली पाणीकपात मागे घेण्यात आली असून परवा (गुरूवार) स्वातंत्र्या दिनापासून शहरात पूर्ववत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर शीला शिंदे यांनी दिली. आमदार अनिल राठोड, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, उपायुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, स्मिता झगडे, यंत्र अभियंता परिमल निकम, नगरसेवक संभाजी कदम, नितीन शेलार, माजी नगरसेवक अनिल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
दुष्काळामुळे गेल्या वर्षी मुळा धरणात पाण्याची पातळी चांगलीच खाली गेली होती. मे महिन्यात धरणाात अवघे ६ हजार ३२२ दशलक्ष घनफूट पाणी होते, त्यामुळेच पाण्याची पातळी १ हजार ७६१ फुटांपर्यंत खाली गेली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मनपाने दि. ५ मे पासून शहरात पाणी कपात लागू केली होती. मध्यवर्ती भागास दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. अजूनही ही पाणी कपात सुरूच आहे. पाणी कपात बंद करावी अशी मागणी नागरिकांकडून सतत सुरू होती.
मागच्या दीड महिन्यात मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला. त्यामुळेच धरणातील पाण्याची आवक वाढून धरणातील पाण्याचा साठा सध्या ७५ टक्क्य़ांच्या वर पोहोचला आहे. पाण्याची पातळीही वाढली असून त्याबाबतचा आढावा निकम यांनी या बैठकीत घेतला. त्यानुसार उन्हाळ्यात लागू करण्यात आलेली पाणीकपात मागे घेऊन परवापासून (गुरूवार) पूर्ववत पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पूर्वीप्रमाणे आठवडय़ात पाच दिवस पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.