महिलांवरचे अन्याय, अत्याचारास प्रतिबंध, महिला सक्षमीकरण अशा विषयांवर जिल्हा, तालुका, गाव स्तरावर जेथे संधी मिळेल तेथे चर्चा झाली तर त्यातून चांगला बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी व्यक्त केला.
जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जाणीव जागृती अभियानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा पाचपुते होत्या. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी कर्डिले यावेळी उपस्थित होते.
डॉ. सुधा कांकरिया, लिला फुंदे व मंगल झावरे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महिलांवरील अन्यायाची विकृती नष्ट करण्यासाठी शिक्षणातून नितीमुल्यांचे संस्कार रुजवण्याची गरज आहे असे मत डॉ. कांकरिया यांनी व्यक्त केले. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी चंद्रशेखर पगारे यांनी प्रास्ताविक केले. बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय तावरे यांनी आभार मानले.