औद्योगिक वसाहतीत खोटे दस्तऐवज बनवून भूखंड लाटल्याप्रकरणी व्यापारी शैलेश वसंतलाल बाबरिया यांना केलेली अटक अन्यायकारक असून, त्यांच्यावरील खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी आज श्रीरामपूर र्मचट असोसिएशनने मोर्चा काढून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, की बाबरिया यांनी कोणताही गुन्हा केला नसून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. औद्योगिक वसाहतीने केलेल्या ठरावानुसार बाबरिया यांना प्लॉट मिळालेला आहे. त्या प्लॉटचे भाडे, मेंटेनन्स चार्जेस त्यांनी भरलेले आहे. याबाबतचा वाद सहकार न्यायालयामध्ये प्रलंबित असतानाही पोलिसांनी बाबरिया यांना अटक करून अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर अध्यक्ष सुधीर डबीर, उपाध्यक्ष मोहनलाल कुकरेजा, संजय कोठारी, विजय सेवक यांच्या सहय़ा आहेत.
औद्योगिक वसाहतीच्या वार्षिक सभेत बाबरिया यांनी बनावट भाडेपट्टा तयार करून दुय्यम निबंधकाच्या सही, शिक्क्यांचा त्यासाठी वापर केला व औद्योगिक वसाहतीचे भूखंड बळकावले अशी तक्रार सुभाष आदिक, राजेंद्र लहारे, बापूसाहेब आढाव, संचालक धनवटे यांनी करून चौकशीची मागणी केली होती. व्यवस्थापक अण्णासाहेब वाडकर यांनी केलेल्या चौकशीत बाबरिया यांनी बनावट भाडेपट्टा व करारनामा केल्याचे निष्पन्न झाले होते. वाडकर यांनी शहर पोलीस ठाण्यात शैलेश व नीलेश मनहरलाल बाबरिया यांच्याविरुद्ध फसवणूक, खोटे दस्तऐवज तयार करणे आदी कलमान्वये फिर्याद दिली होती. पोलिसांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे केलेल्या चौकशीत या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यामुळे वाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानुसार निरीक्षक प्रकाश सपकाळे यांच्या पथकाने बाबरिया यांना अटक केली होती.