पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या इंधन प्रकल्पातील वाहतुकदारांनी आपली मागणी मान्य होईपर्यंत संप यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. रविवारी मध्यरात्री व सोमवारी धुळे व इतर ठिकाणच्या पंपचालकांचे १३ टँकर पानेवाडीहून इंधन भरून खास पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. पंपचालकांनी टँकर भरले नाहीत तर, त्यांच्यावर यापुढे कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई केली जाईल, असा इशारा कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिल्याने संप चिघळला आहे. इतके दिवस शांत असलेले वातावरण आता तणावग्रस्त बनल्याचे दिसत आहे.
सोमवार हा संपाचा तेरावा दिवस. रविवारी नाशिक येथे जिल्हाधिकारी विलास पाटील, उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांच्यासोबत भारत पेट्रोलियमचे व्यवस्थापकीय संचालक सुब्रम्हण्यम यांची बोलणी झाली. कंपनीने वाहतुकीचे दर वाढवून देण्याबाबत असमर्थतता व्यक्त केली. बैठकीस संपकरी वाहतुकदारांच्या प्रतिनिधींना बोलावले नाही. त्यामुळे ही बैठक एकतर्फी असल्याची तक्रार वाहतुकदारांनी कंपनीचे संचालक के. के. गुप्ता यांच्याकडे केली. तेव्हा संपकरी वाहतुकदार, स्थानिक अधिकारी, जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यांसह आपण त्वरित बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन गुप्ता यांनी दिले.
दरम्यान, पंपचालकांवर दबाव आणून त्यांनी स्थानिक संपकरी वाहतुकदारांना न घाबरता इंधन टँकर्स भरून पुरवठा करावा, त्यांना पोलीस संरक्षण देऊ, संपकऱ्यांनी अडथळा आणल्यास त्यांच्याविरुद्ध ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या माध्यमातून संप फोडण्याचा व शांत वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वाहतुकदारांनी केला आहे. जिल्हा प्रशासन व कंपनीच्या कार्यशैलीचा वाहतुकदारांच्या बैठकीत निषेध करण्यात आला. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. सध्याच्या वाहतुकदारांचा करारनामा ३० जूनला संपत आहे. पानेवाडी वगळता राज्यातील इतर पाच इंधन प्रकल्पातील नव्या दराच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. पण, पानेवाडीतील वाहतुकदारांचे १७६ व पंपचालकांचे १५० अशा ३२६ टँकर्स वाहतुकीबाबत कंपनी अन्याय करीत असून नव्या निविदाही मागविण्यात आल्या नाहीत. याबद्दल संपकरी वाहतुकदारांनी तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले. टँकर्स न भरणाऱ्या पंपचालकांना नोटीस, इतर ठिकाणच्या कंपनीच्या प्रकल्पातून इंधनाचा पर्यायी पुरवठा, इतर पंपांना त्यांच्या कंपन्यांचा कोटा वाढवून देण्याचा निर्णय कंपनीने घेतल्यामुळे हा संप मिटण्याऐवजी वाहतुकदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया संपकऱ्यांमधून उमटत आहे.