आगामी काळ कठीण परीक्षेचा व कसोटीचा असून त्यास सामोरे जाताना प्रत्येकाने निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे काम करून सामान्य जनतेची कामे करावीत, अशी अपेक्षा नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केली.
मंगळवारी सायंकाळी शिवछत्रपती रंगभवनात आयोजित एका समारंभात जिल्हा महसूल विभागातर्फे मावळते जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांना निरोप देण्यात आला, तर नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांचे स्वागत करण्यात आले. या दोघा सनदी अधिकाऱ्यांना विठ्ठलाची मूर्ती भेट देण्यात आली. त्या वेळी मनोगत मांडताना डॉ. गेडाम बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्यासह अपर जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आदी उपस्थित होते.
डॉ. गेडाम म्हणाले,‘‘सर्वाच्या सहकार्याने दुष्काळासारख्या भीषण परिस्थितीला जिल्हा प्रशासनाला तोंड द्यावे लागणार आहे. प्रशासनातील मागण्या निश्चितपणे चर्चेने सोडविल्या जातील. चांगल्या कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रसंगी कठोर निर्णय घेतले जातील,’’ अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तर मावळते जिल्हाधिकारी मवारे यांनी, प्रत्येकाने माफक अपेक्षा ठेवावी. त्यामुळेच आयुष्यात समाधानी राहता येते. अशा पध्दतीने जीवन जगणारी कित्येक कुटुंबे आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनातील प्रत्येक घटकाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी पोलीस आयुक्त प्रदीप रासकर म्हणाले,‘‘ शासन हे प्रशासनावर चालते.  गतिमान प्रशासन मावळते जिल्हाधिकारी मवारे हे मृदुभाषी व अहंकार नसलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी आपल्या वर्तनातून सामान्य जनतेसह प्रशासनातील प्रत्येक घटकाचे सकारात्मक स्वरूपात काम केले. तर नूतन जिल्हाधिकारी डॉ. गेडाम हे धाडसी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा निश्चितपणे नावलौकिक कमावेल,’’असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक प्रधान यांच्यासह अपर जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांचीही भाषणे झाली.