आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित लढण्याचे ठरविले असून, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उमेदवारी निश्चित आहे. सांगली जिल्हय़ातील वाळवा, शिराळा या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून आवाडे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी आपण राहणार आहोत, असा निर्वाळा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी इचलकरंजी येथे दिला.
    कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बहुराज्य बँकेच्या कर्मचारी महासंघाच्या वतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन येथे करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयंत पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे होते. माजी मंत्री प्रकाश आवाडे, बँकेचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर उपस्थित होते.
    राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जयंत पाटील यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. हा उल्लेख करून मंत्री पाटील म्हणाले, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आग्रह करून कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यावर देशव्यापी जबाबदारी सोपविली आहे. साखर उद्योगातील त्यांचा अनुभव, कामाची सचोटी, जिद्द याचा नव्या पिढीला लाभ व्हावा या त्यामागे पवारांचा हेतू होता. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सुरू झालेल्या अनावश्यक शेरेबाजीचा संदर्भ देऊन पाटील म्हणाले, निवडणुकीपूर्वी आणि प्रत्यक्ष प्रचाराच्या काळातही मर्यादा सांभाळणे गरजेचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आम्हाला नवखा असल्याने त्याचा अंदाज नव्हता. आता या भागाचा अभ्यास झाला असून, लोकसभा निवडणुकीत आवाडे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू.
    अध्यक्षीय भाषणात कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, शिरोळ तालुक्यातील शिरदवाड गावामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये लोकांनी लोकसभा निवडणुकीविषयी विचारणा केली होती. पण त्यावर मी बोललो नव्हतो.
     जयंत पाटील यांनी आता याबाबत थेट विधान केल्याने लपवून ठेवण्यासारखे काही राहिले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी मान्यता दिली तर ही निवडणूक लढविण्याची मानसिक तयारी केली आहे. माझ्यावर जबाबदारी टाकल्यास नकार देणार नाही. बँकेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम करण्याचे राहून गेले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम निवडणुकीपूर्वी घेण्याचा मानस  असून त्याचा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.