काँग्रेसचे नेते, माजी आमदार चंद्रकांत दत्ताजीराव निंबाळकर (वय ८०) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैराग (ता. बार्शी) येथे बुधवारी दुपारी उशिरा हजारो जमावाच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणा अंत्यसंस्कार करण्यात आले. १९८० ते ९० या काळात ते दोनवेळा शेकापच्या वतीने विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या पश्चात पुत्र वैरागचे सरपंच संतोष निंबाळकर यांच्यासह तीन कन्या व बंधू असा परिवार आहे.
निंबाळकर यांच्यावर तीन वर्षांपूर्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती. अलीकडे त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
शेकापच्या मुशीतून सुमारे ४० वर्षे लोकचळवळीत स्वत:ला झोकून दिलेले चंद्रकांत निंबाळकर यांचा जन्म ७ जानेवारी १९३३ रोजी झाला. १९५७ साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९६२ साली ते प्रथमच जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. १९७१-७२ साली सोलापूर जिल्ह्य़ात भीषण दुष्काळ पडला तेव्हा वैराग येथे धान्य गोदामावर निंबाळकर यांनी शेतकरी व शेतमजुरांचा मोर्चा काढला होता. त्यावेळी मोर्चाला हिंसक वळण लागून पोलिसांनी गोळीबार केला होता. यात आठ शेतकऱ्यांचा बळी गेला होता. या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाला रोजगार हमी योजनेचा कायदा करणे भाग पडले होते. १९८० व १९९० अशा दोन वेळा मोहोळ-वैराग मतदारसंघातून ते निवडून गेले होते. दरम्यान, १९९५-९६ साली वैरागला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून आंदोलन झाले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी वैराग तालुक्याची घोषणाही केली होती. वैराग तालुका निर्मिती, सूतगिरणी, पाण्याचा प्रश्न आदी विकासाच्या मुद्दय़ावर निंबाळकर यांनी स्वत:च्या डाव्या विचारसरणीला मुरड घालून शिवसेनेत प्रवेश केला होता. नंतर शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.
निंबाळकर यांच्या निधनाबद्दल शेकापचे नेते आमदार गणपतराव देशमुख, प्रा. एन. डी. पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल आदींनी शोक व्यक्त करीत दिवंगत नेत्याला श्रध्दांजली अर्पण केली.

shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?