News Flash

अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार

दत्तदर्शन करून परतत असताना काळाने घाला घातल्याने १८ यात्रेकरूंचा मृत्यू ओढवला. त्यांच्या मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले.

| July 24, 2013 01:55 am

दत्तदर्शन करून परतत असताना काळाने घाला घातल्याने  १८ यात्रेकरूंचा मृत्यू ओढवला. या दुर्दैवी घटनेमुळे जत, कवठेमहांकाळ तालुक्यात शोककळा पसरली असून दुर्दैवी यात्रेकरूंवर मंगळवारी त्यांच्या-त्यांच्या मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. तीन महिलांसह १८ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
विजापूर जिल्ह्य़ातील शिंदगीनजीक सांगली जिल्ह्य़ातील क्रुझर गाडीची खासगी आरामबसशी सोमवारी दुपारी समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातग्रस्त मोटारीतून जत तालुक्यातील बागेवाडी, कंठी कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे, बसप्पावाडी येथील भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त गाणगापूरला दत्तदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावी परतत असताना शिंदगीपासून ५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या चिक्क शिंदगी या गावाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात १८ भाविक ठार झाले. यामध्ये सुरेश शिंदे, समाधान शिंदे, तानाजी आजरेकर, लक्ष्मण शिंदे, संतोष शिंदे, सीताराम शिंदे (सर्व रा. बसाप्पावाडी ता. कवठेमहांकाळ) अशोक पंडित कांबळे, जयवंत कांबळे, शिवाजी माळी (रा. कोकळे ता. कवठेमहांकाळ), नजाबाई पवार, बिरू शिंदे, दत्तात्रय देसाई, श्रीमती देसाई, तेजस शिंदे, नंदा चव्हाण, (रा. जत) मच्छिंद्र सलगर (रा. कंठी बागेवाडी) आदींचा समावेश आहे. आज या सर्व यात्रेकरूंच्या मृतदेहांवर त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले.
मच्छिंद्र सलगर यांची  बागेवाडी या ठिकाणी वास्तव्य होते. त्यांची  निस्सीम दत्तभक्त म्हणून  या परिसरात ओळख होती. काही जण त्यांना महाराज म्हणूनही संबोधत होते. बागेवाडीत त्यांनी दत्तमंदिरासह मठाची स्थापना केली आहे. या ठिकाणी दर गुरुवारी श्री दत्तात्रयाची पूजाअर्चा केली जाते. दर गुरुपौर्णिमेला भक्तांसह गाणगापूरला जाण्याचा त्यांचा प्रघात आहे. याच परंपरेने ते रविवारी रात्री २२ भक्तांसह खास मोटारीने गाणगापूरला गेले होते.
दुर्घटनेत मृत्यू पावलेला तेजस पांडुरंग शिंदे हा होतकरू तरुण एक दत्तभक्त म्हणून ओळखला जातो. घरची परिस्थिती नाजूक असतानाही कर्जाऊ रक्कम घेऊन त्याने दत्त मंदिर उभारण्यास प्रारंभही केला होता. परंतु काळाने त्याच्यावर झडप घातली. या दुर्दैवी अपघातानंतर आज जत, कवठेमहांकाळ तालुक्यात शोकाकुल वातावरण होते. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सांगली पोलिसांचे एक पथक उपअधीक्षक पौर्णिमा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी गेले होते. या पथकाने दुर्घटनाग्रस्त लोकांच्या नातेवाइकांना हरत-हेची मदत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 1:55 am

Web Title: funeral on pious in kavathe mahankal and jat
Next Stories
1 राधानगरी धरण तुडुंब भरले पाच दरवाजे मंगळवारी उघडले
2 पत्नीचा छळ, पतीसह सासू, नणंद अटकेत
3 पतीचा खून करून फरारी झालेल्या बारबाला प्रेयसी व प्रियकर अटकेत
Just Now!
X