देवीचा नवस फेडण्यासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनास अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेड तालुक्याच्या थेरडी येथील सहा जणांच्या पार्थिवावर सोमवारी एकाच ठिकाणी सामूहिकरीत्या अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता नथ्थुराम चवरे, मीरा आंभोरे, सुमन आंभोरे, वर्षां उघडे, गायत्री खुडे आणि ज्ञानेश्वर पिलवंड या सहाही जणांचे मृतदेह थेरडी येथे आणले तेव्हा शेकडो नागरिकांनी गावात गर्दी करून आक्रोश केला. ठार झालेल्यांमध्ये नथ्थुराम चवरे, मीरा अंबोरे, सुमन तांबारे, वर्षां उघडे, गायत्री खुडे हे पाच जण तर ज्ञानेश्वर पिलवंड दवाखान्यात मरण पावले.
वाघांशी झुंजणारा ज्ञानेश्वरही मृत
ज्ञानेश्वर पिलवंड याने मागील वर्षी शेतीची रखवाली करताना वाघाशी झुंज दिली होती; परंतु यावेळी मात्र सर्व मृतदेहांना बाहेर काढून दवाखान्यात दाखल झालेला ज्ञानेश्वर मृत्यूशी मात्र झुंज देऊ शकला नाही. त्याच्या आठवणींनी सारा गाव हेलावला होता.