तालुक्यातील वडनेर हवेली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील वादातून पारनेर येथे दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. पारनेर पोलिसांनी वाडेगव्हाणचे उपसरपंच नितीन शेळके यांच्यासह बारा जणांविरुद्घ गुन्हा दाखल केला असून, एकास अटकही करण्यात आली आहे. पारनेर बसस्थानक चौकात मोठय़ा जमावाने हल्ला करून मारहाण केल्याने या परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. मात्र पोलीस यंत्रणा पोहोचताच हल्लेखोर त्यांची वाहने तेथेच सोडून पळून गेले.
वडनेर हवेली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी ग्रामविकास मंडळाच्या विरोधात गावातील तरुणांनी परिवर्तन मंडळाची स्थापना करून निवडणूक लढवली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान परिवर्तन मंडळाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामविकास मंडळाने जिल्हा पोलीसप्रमुखांचे या बाबीकडे लक्ष वेधले होते. पोलीसप्रमुखांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन मतदानाच्या दिवशी कडक बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे मतदान शांततेत पार पडले. सोमवारी मतमोजणी झाल्यानंतर मात्र परिवर्तन मंडळाच्या समर्थकांनी पारनेर बसस्थानक चौकात धुडगूस घातला.
सकाळी पावणेअकराच्या सुमारास तहसील कार्यालयात या निवडणुकची मतमोजणी झाली. परिवर्तनचे सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर परिवर्तनचे समर्थक घोळक्याने घोषणाबाजी करीत बसस्थानक चौकात आले. तेथे लहू भालेकर यांच्या दिग्विजय हॉटेलसमोर घोषणाबाजी करण्यात आली. फटाके फोडण्यात येऊन तेथे उभ्या असलेल्या ग्रामविकास मंडळाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली. राहुल भालेकर व त्याचे वडील उत्तम बाबुराव भालेकर यांना बेदम मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत राहुल याच्या डोक्यास मार लागला असून, उत्तम भालेकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. लहू भालेकर हे वडनेर हवेलीचे रहिवासी असून पराभूत मंडळाचे कार्यकर्ते आहेत. हे लक्षात घेऊन सुपे पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी तेथे उपस्थित होता. परंतु त्याला न जुमानता या टोळक्याने मारहाण सुरूच ठेवली. मारहाणीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले, सहायक निरीक्षक मारुती मुळूक, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक जगदीश मुलगीर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांची कुमक आल्याचे पाहताच टोळक्यातील सर्व जण तेथून पळून गेले.