चालू महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे कृषिदिनी ‘मकृवि’ चा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा नामविस्तार झाला. हरितक्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेल्या नेत्याचे नाव कृषी विद्यापीठास प्राप्त झाल्यानंतर आता या विद्यापीठाचा लौकिक आणखी वाढविण्याची जबाबदारी साहजिकच विद्यापीठाच्या कुलगुरूंसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांना या जबाबदारीचे निश्चित असे भान तर आहेच, पण भविष्यातल्या अनेक संकल्पनांच्या जोरावर हे कृषी विद्यापीठ राष्ट्रीय पातळीवर नावाजले जावे, असाच त्यांचा संकल्प आहे.
मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना १८ मे १९७२ रोजी झाली. कधीकाळी सततचे भांडणतंटे व मारामारीच्या प्रकारांनी गाजलेले हे विद्यापीठ आता हळूहळू स्वतचा ठसा उमटवताना दिसत आहे. डॉ. गोरे यांनी २५ जानेवारी २०११ रोजी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली. काळाची गरज लक्षात घेताना विद्यापीठ व्यवस्थेत आमूलाग्र बदल, शिक्षण संशोधन व विस्तार कार्यात विद्यापीठ अधिकाधिक लोकाभिमुख कसे करता येईल, यावर डॉ. गोरे यांनी भर दिला.
काही महिन्यांपूर्वी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्सेस’, तसेच ज्येष्ठ कृषीशात्रज्ञ डॉ. कीर्तिसिंग यांना ‘कृषिरत्न’ या मानाच्या पदव्या विद्यापीठाने समारंभपूर्वक दिल्या. आपल्या कारकिर्दीतील ही महत्त्वपूर्ण घटना असल्याचे डॉ. गोरे यांना वाटते.
काळ बदलतो आहे आणि बदलत्या काळाचे पडसाद शेती व्यवसायातही उमटत आहेत. मराठवाडय़ात ८६ टक्के जमीन कोरडवाहू आहे. कोरडवाहू शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कृषी विद्यापीठाला जोमाने पावले उचलावी लागणार आहेत. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे, याच भूमिकेतून डॉ. गोरे यांनी आखलेल्या अनेक संकल्पनांना आता मूर्त रूप आले आहे.
मराठवाडय़ात पाऊस कमी पडतो, त्यातही दोन पावसांमध्ये जो खंड असतो, त्याचा मोठा फटका कोरडवाहू शेतीला बसतो. अशा वेळी जमीन, पाणी, हवामान यांचा उचित अभ्यास करून जिल्हानिहाय वस्तुनिष्ठ आराखडा करणे सध्या सुरू आहे. असा आराखडा झाल्यास मराठवाडय़ाच्या प्रत्येक जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीचे ‘निदान’ करणे सोयीचे जाणार आहे.
विद्यापीठाने अनेक महत्त्वपूर्ण करार केले आहेत. विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळत आहे. कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी चमकदार कामगिरी करीत आहेत. गेल्याच वर्षी ‘जे.आर.एफ’ साठी निवड झालेल्या देशातील पहिले तिन्ही विद्यार्थी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे होते. विद्यापीठाचे ग्रंथालय अद्ययावत आहे. डॉ. गोरे यांच्याकडे कुलगुरुपदाची सूत्रे आल्यानंतर परिसर मुलाखतींना प्राधान्य देण्यात आले. विद्यापीठात ११ समुपदेशन व रोजगार कक्ष कार्यरत आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थांमध्ये पीएच. डी. साठी विद्यापीठाचे सहा विद्यार्थी दाखल झाले आहेत.
शेतीमालावर प्रक्रियेचे प्रमाण अजूनही अतिशय नगण्य आहे. प्रगत देशात ६० ते ८० टक्के असणारे हे प्रमाण आपल्याकडे जेमतेम ८-९ टक्के आहे. प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. त्यानुसार विद्यापीठाने काही पावले टाकली आहेत. भारत-इस्राएल कराराच्या माध्यमातून औरंगाबाद येथे ७ कोटी ४४ लाख खर्चाचे केशर आंबा गुणवत्ता केंद्र औरंगाबादला फळ संशोधन केंद्रात मंजूर केले आहे. कपाशीचा देशी वाण विकसीत करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. शेतीक्षेत्रात मोठय़ा बदलाची गरज असून शास्त्रज्ञ-शेतकरी सुसंवाद वाढणे आवश्यक आहे, असेही डॉ. गोरे यांना वाटते.
‘विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ या अभिनव उपक्रमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्याच्या संकल्पनेची देशभर प्रशंसा झाली. विद्यापीठातून वाहणाऱ्या िपगळगढ नाल्याचा विकास करण्याची योजनाही सध्या प्रगतिपथावर आहे.